आगामी लोकसभा निवडणुकीसाठी भाजपा सहकारी पक्षांना सोबत घेण्यासाठी देशभरात सध्या मिशन मोडवर आहे. राज्यात शिवसेनेच्या मोठ्या ड्राम्यानंतर काल भाजपाने सेनेशी असलेली सर्वात जुनी युती राखण्यात यश मिळवले. त्यानंतर आज तामिळनाडूत पट्टली मक्कल काची (पीएमके) या पक्षाला सोबत घेत अण्णा द्रमुकसोबतची (अद्रमुक) पारंपारिक युती राखली. यामध्ये तामिळनाडूत भाजपाच्या वाट्याला ५ लोकसभेच्या जागा आल्या आहेत.


या युतीच्या चर्चेसाठी केंद्रीय मंत्री पीयूष गोयल आज चेन्नईत दाखल झाले होते. गोयल म्हणाले की, तामिळनाडूचे मुख्यमंत्री आणि अद्रमुकचे नेते ई. पलानीसामी आणि उपमुख्यमंत्री ओ. पनिरसेल्वम यांच्या नेतृत्वाखाली तामिळनाडूत निवडणूक लढवण्यात येईल. तर केंद्रात मोदींच्या नेतृत्वाखील निवडणूक लढवली जाईल.

या युतीमुळे आपल्या मागण्यांवरुन युतीपासून दूर जाताना दिसत असलेल्या पीएमकेला यामध्ये मोठा फायदा झाला आहे. त्यांना एकूण ३९ जागांपैकी ७ जागा देण्यात आल्या आहेत. विधानसभेच्या पोटनिवडणुकीत २१ जागांवर दिलेल्या पाठींब्याच्या बदल्यात पीएमकेला लोकसभेसाठी या ७ जागा देण्यात आल्या आहेत. गेल्या लोकसभा निवडणुकीत अद्रमुकला तामिळनाडूत ३९ पैकी ३७ जागा जिंकल्या होत्या.

दुसरीकडे अद्रमुकला शह देण्यासाठी द्रमुक आपल्या नेतृत्वात काँग्रेससोबत आठ पक्षांची आघाडी तयार करण्याच्या प्रयत्नात आहे.