काँग्रेस नेते राहुल गांधी यांची भारत जोडो न्याय यात्रा सध्या उत्तर प्रदेशमध्ये आहे. आगामी लोकसभा निवडणूक अगदी तोंडावर आल्यामुळे ते भाजपावर सडकून टीका करत आहेत. मात्र उत्तर प्रदेशमध्ये बोलताना त्यांनी पत्रकाराच्या मालकाचे नाव विचारून मालकाची जात काय आहे? हे जाणून घेण्याचा प्रयत्न केल्यामुळे पत्रकार मंडळींनी नाराजी व्यक्त केली. त्यानंर आता राहुल गांधी यांनी आपल्या भाषणात अभिनेत्री ऐश्वर्या राय हीचा उल्लेख केल्यामुळे भाजपाने त्यांच्यावर टीका केली आहे. स्वावलंबी आणि यशस्वी महिलांचे राहुल गांधी यांना वावडे आहे. राहुल गांधींनी खालची पातळी गाठली आहे, असा हल्लाबोल भाजपाने केलाय.

राहुल गांधी काय म्हणाले होते?

उत्तर प्रदेशमध्ये बोलताना राहुल गांधी यांनी अयोध्येतील राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचा उल्लेख केला. या सोहळ्याला बॉलिवूडचे बडे सेलिब्रिटी उपस्थिती होते. अब्जाधीश उपस्थित होते. मात्र देशात ७३ टक्के ओबीसी, दलित आदिवासी आहेत. या समुदायातील कोणीही या सोहळ्याला उपस्थित नव्हता, अशी टीका राहुल गांधींनी केली. यावेळी त्यांनी ऐश्वर्या राय यांच्या नावाचा उल्लेख केला. राहुल गांधींच्या याच विधानामुळे भाजपाने त्यांच्यावर टीका केली आहे.

भाजपाने काय टीका केली?

“राहुल गांधी यांना भारतातील जनतेने नेहमीच नाकारले आहे. त्यामुळे निराश होऊन ते खालच्या पातळीची विधाने करत आहेत. भारताचा अभिमान असलेल्या ऐश्वर्या राय यांना अपमानित करणारे विधान त्यांनी केले,” अशी टीका कर्नाटक भाजपाच्या प्रदेशाध्यक्षांनी केली. राहुल गांधी हे घराणेशाहीची चौथी पिढी आहे. त्यांनी आतापर्यंत कोणतीही चांगली कामगिरी केलेली नाही. आता ते भारताला अधिक गैरव मिळवून देणाऱ्या ऐश्वर्या राय यांच्याविषयी अपशब्द वापरत आहेत, असेदेखील कर्नाटक भाजपाने म्हटले आहे.

भाजपाकडून व्हिडीओ शेअर

ही टीका करताना भाजपाने समाजमाध्यमांवर एक व्हिडीओ क्लीप शेअर केली आहे. यामध्ये राहुल गांधी वेगवेगळ्या ठिकाणी ऐश्वर्या राय यांचा उल्लेख करताना दिसत आहेत. गायिका सोना मोहपात्रा यांनीदेखील राहुल गांधींवर याच विधानामुळे टीका केली आहे.