लव्ह जिहादचा आरोप करून लग्नात अडथळा आणू पाहणाऱ्या उत्तर प्रदेशमधल्या एका नेत्याची भाजपनं हकालपट्टी केली आहे. दोन दिवसांपूर्वी काही कार्यकर्त्यांसोबत मिळून भाजपचे गाझियाबाद शहर प्रमुख अजय शर्मा यांनी आतंरजातीय विवाहाला कडाडून विरोध केला होता. याच मुद्द्यावरून त्यांनी पोलिसांशीही हुज्जत घातली. पोलीस, अजय शर्मा आणि त्यांच्या कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाचीही झाली. या अरेरावीनंतर अखेर अजय शर्मा यांची गाझियाबादच्या शहर प्रमुख पदावरून हकालपट्टी करण्यात आली आहे.

नूपुर सिंघल आणि मंसूर खान या दोघांनी काही दिवसांपूर्वी लग्न केलं. पण, दोघांचं लग्न हा लव्ह जिहाद असून अजय शर्मा यांनी या लग्नाला कडाडून विरोध केला. या जोडप्याच्या राजनगर येथील घरी रिसेप्शन सुरू असताना भाजप, जय शिव सेना, बजरंग दलाचे १०० हून अधिक कार्यकर्ते पोहोचले आणि या परिसरातील वाहतूक वेठीस धरण्याचा प्रयत्न केला. नुपूर यांच्या कुटुंबियांनी याची माहिती तातडीनं पोलिसांना दिली. लग्न एखाद्याची खासगी बाब आहे तेव्हा एका नेत्यानं त्यात हस्तक्षेप करणं चुकीचं असल्याचं या परिवाराचं म्हणणं होतं. नुपूर यांच्या घराबाहेर कार्यकर्त्यांचा गोंधळ सुरू असताना पोलीस तिथे पोहोचले. पोलिस आणि कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाची झाली.

नवऱ्या मुलाच्या कुटुंबाकडून आलेल्या तक्रारीनंतर अखेर पोलिसांकडून या कार्यकर्त्यांवर कारवाई करण्यात आली आहे, तसेच लव्ह जिहादच्या आरोपावरून वैयक्तिक आयुष्यात नाक खुपसू पाहणाऱ्या शर्मा यांची तातडीनं भाजपाकडून हकालपट्टी करण्यात आली.