पीटीआय, हैदराबाद
‘भाजप तेलंगणला भारत राष्ट्र समितीच्या (बीआरएस) तावडीतून मुक्त करेल,’ अशी ग्वाही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी दिली. तेलंगणमधील सत्ताधारी भारत राष्ट्र समिती पक्षाच्या भ्रष्ट नेत्यांना कारावासात पाठवण्याचा निर्धारही भाजपने केला असल्याचेही त्यांनी सांगितले.
महबूबाबाद येथे एका निवडणूक प्रचारसभेस संबोधित करताना मोदी म्हणाले की, तेलंगणला ‘बीआरएस’च्या पंजातून मुक्त करण्याची भाजपची जबाबदारी आहे. भाजप सत्तेवर आल्यास तेलंगणमध्ये मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव (केसीआर) यांनी केलेल्या भ्रष्टाचाराची चौकशी केली जाईल. तेलंगणच्या गरीब आणि तरुणांचा विश्वासघात करणाऱ्यांना सोडणार नाही, असे आश्वासनही त्यांनी दिले. ‘बीआरएस’च्या भ्रष्ट नेत्यांना कारावासात तुरुंगात पाठवण्याचा आमचा संकल्प आहे असे ते म्हणाले.