उत्तर प्रदेशातील बदायूंमध्ये केशकर्तनालय चालवणाऱ्या एका व्यक्तीने दोन लहान मुलांची गळा चिरून हत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. मंगळवारी संध्याकाळी मंडई चौकीपासून काही अंतरावर ही घटना घडली. दुहेरी हत्याकांडातील आरोपीच्या वडील आणि चुलत्याला पोलिसांनी बुधवारी ताब्यात घेतले. पोलिसांनी सांगितले की, आरोपी साजिद (२२) हा हत्या केल्यानंतर काही तासांनी झालेल्या चकमकीत मारला गेला तर त्याचा भाऊ जावेद फरार आहे. या परिसरात नुकतेच केशकर्तनालय उघडणाऱ्या साजिदने मंगळवारी घरात घुसून आयुष (१२), अहान उर्फ हनी (८) आणि युवराज (१०) या तीन अल्पवयीन भावांवर चाकूने हल्ला केला. यात आयुष आणि अहान यांचा मृत्यू झाला, तर युवराजला गंभीर अवस्थेत रुग्णालयात दाखल करण्यात आले. मृत मुलांचे वडील खासगी कंत्राटदार असून, घटनेच्या वेळी ते जिल्ह्याबाहेर होते. घरी त्यांची पत्नी संगीता व्यतिरिक्त त्याची आई (मृत मुलांची आजी) देखील होती. पोलिसांनी अद्याप या घटनेमागचा हेतू स्पष्ट केलेला नाही. दरम्यान, बुधवारी सकाळी शवविच्छेदनानंतर दोन्ही मुलांवर अंत्यसंस्कार करण्यात आले.

दरम्यान, आरोपी साजिदच्या आईने या हत्येच्या घटनेचं वृत्त ऐकून दुःख व्यक्त केलं. तसेच साजिदची आई पोलीस चकमकीबाबत म्हणाल्या की, “त्याच्याबरोबर जे झालं ते योग्यच होतं.” साजिद मारला गेला असला तरी त्याचा भाऊ आणि या हत्यांमध्ये सहभागी असणारा आरोपी जावेद अद्याप फरार आहे. या हत्या आणि पोलीस चकमकीवर साजिदची आई नाजिन म्हणाल्या, माझी मुलं इतका क्रूर गुन्हा करण्यास कशामुळे प्रवृत्त झाले याची मला कल्पना नाही. त्यांच्या मनात काय चाललंय ते मला माहिती नाही. घरात काही चिंतेचं वातावरणही नव्हतं. तरी त्यांनी असं का केलं त्याबद्दल काहीच माहिती नाही. त्यामुळे मी याबद्दल काही सांगू शकणार नाही. दोन्ही मुलं सकाळी नाश्ता करून घरातून निघाली. त्यानंतर त्यांनी असं का केलं हे मला माहिती नाही.

नाजिन म्हणाल्या, “दोन्ही मुलांनी विनोद आणि संगीताच्या घराजवळ केशकर्तनालय सुरू केलं होतं. त्यांचं कोणाशी कसल्याही प्रकारचं शत्रूत्व नव्हतं. पीडित कुटुंबाबरोबर जे काही झालं त्याचं मलाही दुःख आहे. साजिदने जे काही केलंय त्याची शिक्षा त्याला मिळाली. त्याने या हत्या केल्या नसत्या तर त्याला हे सगळं भोगावं लागलं नसतं. त्यांच्याबरोबर जे झालं ते चांगलंच झालं. गुन्हे कराल तर तुम्हाला शिक्षा भोगावीच लागेल.” टाईम्स ऑफ इंडियाने याबाबतचं वृत्त प्रसिद्ध केलं आहे.

हे ही वाचा >> ‘तो’ फरार गुन्हेगार अटकेनंतर झाला श्रावण बाळ! स्वतःच्या कातड्याचे जोडे बनवून आईला घातले अन् मग…

साजिद पोलीस चकमकीत ठार

बदायूचे पोलीस अधिक्षक आलोक प्रियदर्शनी यांनी दिलेल्या माहितीनुसार, मुलांची हत्या केल्यानंतर आरोपी साजिदने घटनास्थळावरून पळ काढला. काही वेळातच तो जवळच्या एका जंगलात लपून बसल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांचं एक पथक त्या ठिकाणी पोहोचलं. तेव्हा पोलिसांनी या आरोपीला पकडण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्याने पोलिसांवर गोळीबार केला. त्यानंतर पोलिसांनीदेखील प्रत्युत्तरात गोळीबार केला. यामध्ये आरोपीचा मृत्यू झाला. दरम्यान, या हत्येचं कारण अद्यापही अस्पष्ट असून पोलीस या घटनेचा तपास करत आहेत.