उत्तर प्रदेशातील एटा जिल्ह्यात झालेल्या अपघातात २४ विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला आहे. अलीगंज भागात शाळेची बस एका वाळूची वाहतूक करणाऱ्या ट्रकला आदळल्याने हा अपघात झाला. या अपघातात अनेक विद्यार्थी जखमीदेखील झाले आहेत. यामधील अनेकजण गंभीर जखमी असल्याने जखमींचा मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे. यानंतर क्रेनच्या मदतीने अपघातग्रस्त गाड्या हटवण्यात आल्या. या अपघातात वाळूची वाहतूक करणाऱ्या ट्रकचा चालकदेखील गंभीर जखमी झाला आहे. दाट धुक्यामुळे दृश्यमानता कमी झाल्याने हा अपघात झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जातो आहे.

जे. एस. विद्या शाळेची बस ५० विद्यार्थ्यांना घेऊन जात असताना हा अपघात झाला. शाळेची बस ट्रकवर जाऊन आदळल्याने झालेल्या अपघातात २४ पेक्षा अधिक जणांचा मृत्यू झाला आहे. ‘अपघातानंतर बसमध्ये अडकलेल्या विद्यार्थ्यांना बाहेर काढण्याचे काम प्राधान्याने सुरू आहे. अपघातात जखमी झालेल्यांना रुग्णालयात दाखल केले जात आहे,’ अशी माहिती उत्तर प्रदेशचे पोलीस महासंचालक जावेद अहमद यांनी दिली आहे.

उत्तर प्रदेशात थंडीचा कडाका वाढला आहे. अनेक भागांमध्ये दाट धुके पसरल्याने दृश्यमानतेत मोठी घट झाली आहे. त्यामुळे स्थानिक प्रशासनाने सर्व शाळांना सुट्टी जाहीर केली आहे. मात्र तरीही जे. एस. विद्या शाळेच्या व्यवस्थापनाने शाळा सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला.