चीनमध्ये करोना रुग्णांची संख्या पुन्हा वाढू लागली आहे. लक्षणं असलेल्या लोकांना क्वारंटाईन केलं जातयं. अशातच करोना नियमांचं पालन करण्याच्या नावाखाली एका श्वानाला बेदम मारहाण करून मारून टाकण्यात आलंय. आरोग्य कर्मचार्‍यांनी ज्या वेळी घरात घुसून पाळीव कुत्र्याला मारले तेव्हा त्याची मालकीन करोनामुळे आयसोलेशनमध्ये होती. या घटनेचा व्हिडिओ समोर आल्यानंतर नेटकऱ्यांनी संताप व्यक्त केला आहे. तसेच करोना नियमांचं पालन करण्याच्या नावाखाली अशा क्रूर पद्धतीने प्राण्याचा जीव अधिकारी कसा घेऊ शकतात, असे अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत.

‘डेली मेल’च्या वृत्तानुसार, जिआंग्शी प्रांतातील शांगराव येथे आरोग्य कर्मचाऱ्यांनी एका घरात घुसून कुत्र्याच्या डोक्यावर लोखंडी रॉडने हल्ला केला. या घटनेचा एक व्हिडिओ समोर आला आहे, ज्यामध्ये पीपीई किट घातलेले लोक कुत्र्यावर हल्ला करताना दिसत आहेत. या लोकांनी पाळीव कुत्र्याला रॉडने मारून ठार केले आहे.

कुत्र्याच्या मालकिनीचे नाव फू आहे. ज्यावेळी कुत्र्याला मारलं तेव्हा फू घराबाहेर एका हॉटेलमध्ये आयसोलेशनमध्ये  होती. फू चा करोना रिपोर्ट निगेटिव्ह आला होता. परंतु कुत्र्याची अजून चाचणी व्हायची होती. कुत्र्याला कोरोनाची लक्षणे असल्याच्या संशयावरून मारण्यात आल्याचा आरोप आहे.

कुत्र्याची मालकीन फू ला तिच्या परिसरात करोना पॉझिटिव्ह लोक आढळल्यानंतर घर सोडण्याचे आदेश देण्यात आले. त्यानंतर अवघ्या काही तासांनंतर, सीसीटीव्ही फुटेजमध्ये दोन आरोग्य कर्मचारी रॉड आणि प्लास्टिकची पिशवी घेऊन तिच्या घरात प्रवेश करताना दिसतात. ते एका टेबलाखाली लपलेल्या कुत्र्याला शोधतात आणि नंतर त्याच्या डोक्यावर रॉड मारतात. या कृत्यामुळे कोरोना विषाणूचा सामना करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या कठोर पद्धतींवरून वादाला तोंड फुटले आहे.