पीटीआय, कोळिक्कोड

इस्रायलशी संबंध असलेल्या आणि इराणने ताबा मिळवलेल्या एका मालवाहू जहाजावरील आपल्या मुलाच्या सुरक्षिततेची केरळच्या कोळिक्कोड जिल्ह्यातील एका दांपत्याला काळजी लागली असून, तो परत येण्यासाठी ते प्रार्थना करत आहेत.

 इराणच्या रिव्होल्यूशनरी गार्डने  शनिवारी होर्मुझच्या आखाताजवळ ताब्यात घेतलेल्या इस्रायलशी संबंधित मालवाहू जहाजावरील १७ जणांमध्ये या दांपत्याचा श्यामनाथ नावाचा मुलगाही आहे. ‘एमएससी एरिज’ नावाचे हे जहाज नुकतेच ताब्यात घेण्यात आले. आपण मुलाशी शनिवारीही बोललो होतो, असे अद्याप या बातमीच्या धक्क्यातून न सावरलेले श्यामनाथचे आईवडील विश्वनाथन आणि श्यामला यांनी सांगितले. रविवारी त्यांना शिपिंग कंपनीच्या मुंबई कार्यालयातून याबद्दल माहिती देणारा फोन आला.

हेही वाचा >>>‘हे तर जुमला पत्र’, भाजपाच्या जाहीरनाम्यावर विरोधकांची टीका; महागाई, बेरोजगारीचा उल्लेख नाही

 ‘आम्ही कठीण परिस्थितीतून जात आहोत. आमच्या मुलाच्या सुरक्षिततेबद्दल आम्ही अतिशय चिंतित आहोत. जहाज ताब्यात घेण्यात आल्यानंतर आम्ही त्यावरील कर्मचाऱ्यांशी संपर्क साधू शकलेलो नाही, असे कंपनीच्या अधिकाऱ्यांनी आम्हाला सांगितले’, असे विश्वनाथन म्हणाले.कोळिक्कोड जिल्ह्यातील वेल्लिपरंबा येथील रहिवासी असलेला श्यामनाथ गेली दहा वर्षे ‘एमएससी अ‍ॅरिज’मध्ये द्वितीय अभियंता म्हणून काम करत आहे.