छत्तीसगडच्या मुख्यमंत्र्यांची राहुल यांच्याशी पुन्हा चर्चा

छत्तीसगडमध्ये मुख्यमंत्री भुपेश बघेल यांच्याविरोधात आरोग्यमंत्री टी.एस. सिंहदेव असा काँग्रेसअंतर्गत वाद शिगेला पोहोचला आहे. आठवड्यात दुसऱ्यांदा मुख्यमंत्री बघेल यांनी दिल्लीत काँग्रेस नेते राहुल गांधी यांची भेट घेतली. यापूर्वी मंगळवारी त्यांनी चर्चा केली होती. त्यामुळे राज्यात नेतृत्वबदलाच्या चर्चेने जोर धरला आहे. भेटीवेळी प्रदेश प्रभारी पी.एल. पुनिया हेही उपस्थित होते.

या आठवड्यात दुसऱ्यांदा बघेल यांनी राहुल गांधी यांची भेट घेतली आहे. तसेच बुधवारी बघेल तसेच सिंहदेव यांनी काँग्रेसचे संघटन सचिव के.सी. वेणुगोपाल यांची भेट घेतली होती. राज्यात भाजपच्या पंधरा वर्षांच्या सत्तेनंतर २०१८ मध्ये काँग्रेस सत्तेत आल्यानंतर  प्रत्येकी अडीच-अडीच वर्षे मुख्यमंत्रिपद देण्याचे करार झाल्याचा दाखला सिंहदेव देत आहेत. जूनमध्ये बघेल यांनी अडीच वर्षांचा कालावधी पूर्ण केला आहे.

पक्षनेतृत्वाने बोलावल्याने दिल्लीला जात असल्याचे बघेल यांनी स्पष्ट केले. बघेल समर्थक अनेक आमदार तसेच मंत्री दिल्लीतच आहेत. त्याबाबत विचारता, त्यांनी पक्षनेतृत्वाला भेटू नये काय? असा प्रतिसवाल बघेल यांनी पत्रकारांशी बोलताना केला. राज्यातील काही मंत्री तसेच आमदारांनी पुनिया यांची भेट घेऊन बघेल यांनी उत्तम कारभार केल्याचा दाखला दिला आहे.