पाच राज्यांतील निवडणुका हरल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना शेतकऱ्यांची आठवण आली आहे, अशा शब्दांत कर्जमाफीच्या आश्वासनांबाबत काँग्रेस शेतकऱ्यांची दिशाभूल करत असल्याच्या मोदी यांच्या आरोपांबाबत काँग्रेसने शनिवारी त्यांच्यावर उलटवार केला.

शेतकऱ्यांची कर्जे माफ करण्यात येईपर्यंत आणि त्यांना सर्व सोयी उपलब्ध करून दिल्या जाईपर्यंत आमचा पक्ष झोपणार नाही किंवा पंतप्रधानांनाही झोपू देणार नाही, असे काँग्रेसचे प्रवक्ते आरपीएन सिंह यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

कर्जमाफीच्या आश्वासनांबाबत काँग्रेस शेतकऱ्यांची दिशाभूल करत असल्याचा आरोप मोदी यांनी उत्तर प्रदेशच्या पूर्वाचल भागाच्या एक दिवसाच्या दौऱ्यात केला होता. त्यावर सिंह यांनी ही प्रतिक्रिया दिली. २००८ साली काँग्रेसने ७७ हजार रुपयांची कर्जे माफ केली त्यावेळी ते (मोदी) काय करत होते? आम्ही त्याचा कुठलाही प्रचार केला नाही. आम्ही हा पैसा थेट कर्जदार शेतकऱ्यांच्या खात्यांमध्ये जमा केला, असे ते म्हणाले.

आता पाच वर्षांनंतर पंतप्रधान शेतकऱ्यांबाबत विचार करत आहेत, हे दुर्दैवी आहे. भाजप पाच राज्यांत हरल्यानंतर आणि काँग्रेसने तीन राज्यांमध्ये सत्तेवर आल्यानंतर काही वेळातच शेतकऱ्यांची कर्जे माफ केल्यानंतर त्यांना आता शेतकऱ्यांची आठवण येत आहे, असा टोला सिंह यांनी लगावला.