scorecardresearch

“ख्रिश्चन नसते तर तामिळनाडूची अवस्था बिहारसारखी झाली असती”; नेत्याच्या विधानाने नवा वाद, भाजपानेही घेतली वादात उडी

“तुम्ही तुमच्या सर्व समस्यांची यादी करा आणि ती थेट मुख्यमंत्र्यांना द्या. ते कशालाच नाही म्हणणार नाहीत,” असंही ते म्हणाले.

Tamil Nadu would have become Bihar
जाहीर कार्यक्रमात बोलताना केलं विधान

तामिळनाडूच्या विधानसभेचे अध्यक्ष आणि डीएमकेचे नेते एम अप्पावू यांनी महिन्याभरापूर्वी एका वक्तव्यावरुन सध्या वाद निर्माण झालाय. तामिळनाडूचा विकास हा ख्रिश्चन धर्मियांमुळे झाल्याचा दावा या वक्तव्यामध्ये अप्पवू यांनी केला होता. ख्रिश्चन धर्मीय नसते तर तामिळनाडूचा बिहार झाला असता असंही ते राज्याच्या विकासासंदर्भात म्हणाल्याने वाद निर्माण झालाय.

मागील महिन्यामध्ये २८ जून रोजी अप्पावू आणि डीएमचे आमदार इनगो रुद्रराज हे सेंट पॉल या रोमन कॅथलिक विद्यालयामधील कार्यक्रमात सहभागी झाले होते. यावेळेस अप्पवू यांनी विद्यार्थ्यांसमोर भाषण केलं. या भाषणात त्यांनी, “ख्रिश्चन धर्मीय लोक इथे नसते तर तामिळनाडूची अवस्था बिहारसारखी झाली असती. कॅथलिक समाजातील फादर्स आणि सिस्टर्सनेच मला आज या मानाच्या पदापर्यंत पोहचण्यासाठी मदत केली. तामिळनाडू सरकार हे तुमचं सरकार आहे. तुम्ही हे सरकार बनवलं आहे. तुमच्या प्रार्थना आणि उपवासांच्या माध्यमातून मिळालेल्या आशीर्वादामुळे हे सरकार स्थापन झालंय. कॅथलिक ख्रिश्चन आणि या धर्मातील लोकांमुळेच आधुनिक द्राविडीयन सरकार व्यवस्थेमध्ये सामाजिक न्याय टिकून आहे,” असं म्हणत ख्रिश्चन धर्मियांचं महत्वं सांगण्याचा प्रयत्न केला.

“तुम्हाला (कॅथलिक ख्रिश्चन लोकांना) इतर कोणावर अवलंबून राहण्याची गरज नाहीय. तुम्ही तुमच्या सर्व समस्यांची यादी करा आणि ती थेट मुख्यमंत्र्यांना द्या. ते कशालाच नाही म्हणणार नाहीत आणि तुमच्या सर्व समस्या सोडवतील कारण त्यांना माहितीय सरकार तुमच्यामुळेच आहे. हे तुमचं सरकार आणि तुमचे मुख्यमंत्री आहेत. यामध्ये मी तुमच्यासोबत आहेत. राज्यामधून ख्रिश्चन बाजूला काढले तर राज्यात प्रगती होणार नाही. तामिळनाडूच्या विकासामागे कॅथलिक ख्रिश्चन हे महत्वाचं कारण आहे. आजचं तामिळनाडू राज्य हे तुम्ही उभारलं आहे,” असंही अप्पावू यांनी भाषणात म्हटलं.

आता महिन्याभरापूर्वीचं हे अप्पावू यांचं भाषण सोशल मीडियावर व्हायरल झालं आहे. भाजपाने या प्रकरणावरुन डीएमकेवर टीका केली आहे. तामिळनाडूच्या विधानसभा अध्यक्षांवर या वक्तव्यांवरुन टीकेची झोड उठवली जात आहे. तामिळनाडू भाजपाचे उपाध्यक्ष आणि प्रवक्ते रानायण यांनी सोशल मीडियावरुन अप्पावू यांना लक्ष्य केलंय. “ही डीएमकेची धर्मनिरपेक्षता आहे का? त्यांनी स्वत:ला धर्मनिरपेक्ष पक्ष म्हणवून घेण्याचा हक्क गमावला आहे. आता हे सिद्ध झालं आहे की डीएमके हा हिंदू-विरोधी पक्ष आहे,” असं नारायणा यांनी म्हटलंय.

मात्र अप्पावू यांनी भाजपावर टीका करताना भाजपा या विषयावरुन ध्रुवीकरण करु पाहत असल्याचं म्हटलंय. “ते माझं भाषण व्हायरल करत असतील तर ते चांगलं आहे. मी असं बोललोच नाही असं मुळीच म्हणणार नाही. हो मी हे बोललोय. मात्र सोशल मीडियावर मोजकी वाक्य व्हायरल केली आहेत. मी जे बोललोय तो इतिहास आहे. यावरुन राजकारण करण्याची गरज नाही,” असं अप्पावू यांनी एएनआयशी बोलताना म्हटलंय.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 26-07-2022 at 13:39 IST

संबंधित बातम्या