नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी निवडणूक प्रचारसभांमधून धर्माच्या आधारावर समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करत असल्याची गंभीर तक्रार काँग्रेसने सोमवारी केंद्रीय निवडणूक आयोगाकडे केली. काँग्रेसच्या शिष्टमंडळाने आयोगाची भेट घेऊन आचारसंहिता उल्लंघनासंदर्भात सहा तक्रारी दाखल केल्या आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

स्वातंत्र्यपूर्व काळातील ‘मुस्लीम लीग’च्या विभाजनवादी विचारांची भाषा काँग्रेसच्या जाहीरानाम्यामध्ये असल्याचा आरोप मोदींनी शनिवारी अजमेरमधील जाहीर सभेत केला होता. हाच आरोप मोदींनी सोमवारी छत्तीसगढमधील बस्तर व महाराष्ट्रात चंद्रपूरमध्ये झालेल्या प्रचारसभेतही केला. काँग्रेसचे शिष्टमंडळ मोदींविरोधात निवडणूक आयोगाकडे तक्रार दाखल करण्यासाठी गेला असतानाच मोदींनी तिसऱ्यांदा हा आरोप केला. या मुद्दय़ावरून काँग्रेस व भाजपमध्ये वाद तीव्र झाला आहे. मोदींनंतर भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनीही हीच टीका केली आहे.

हेही वाचा >>>संजय सिंह यांची याचिका फेटाळली; पंतप्रधान मोदी यांच्या पदवीबद्दल आक्षेपार्ह टिप्पणी केल्याचा आरोप

‘मुस्लिम लीग’ने ब्रिटिशांचा प्रस्ताव मान्य करून देशाची फाळणी केली होती. हाच देशाचे तुकडे करण्याचा विचार काँग्रेसच्या जाहीरनाम्यातून दिसतो, असा आरोप मोदींनी जाहीरसभेत केला होता. शिवाय, हा जाहीरनामा म्हणजे ‘बंडलबाजी’ असल्याचेही मोदी म्हणाले होते. मोदींच्या या विधानांवर काँग्रेसने आक्षेप घेतला असून ‘मुस्लिम लीग’चे नाव घेऊन धर्माच्या आधारावर समाजामध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न मोदी करत असल्याची तक्रार काँग्रेसने केली आहे.

मोदींनी आचारसंहिता व भारतीय दंड संहितेच्या तरतुदींचे (अनुच्छेद १५३ नुसार) उल्लंघन केल्याचे तक्रारीत म्हटले आहे. खोटी माहिती देऊन व प्रक्षोभक दाव्यांचा प्रचार करून मोदींनी मतदारांच्या ध्रुवीकरणाचा व समाजामध्ये फूट पाडून मतदारांचा भावनिक पािठबा मिळवण्याचा प्रयत्न केला आहे. मताधिक्य मिळवण्यासाठी जातीय तेढ निर्माण करण्याच्या मोठय़ा कटाचा हा भाग असल्याचेही काँग्रेसने म्हटले आहे. मोदींच्या या आक्षेपार्ह टिप्पण्यांकडे आयोगाने डोळेझाक करू नये. मोदींविरोधात कठोर व त्वरीत कारवाई करावी, अशी मागणीही काँग्रेसने केली आहे.

पक्षाचा आक्षेप

सैन्यदलाशी निगडीत मुद्दे वा सैन्यदलाच्या कार्यक्रमातील मोदींच्या सहभागाच्या चित्रफितींचा प्रचारासाठी भाजपकडून होत असलेल्या वापरावरही काँग्रेसने आक्षेप नोंदवला आहे.

‘तृणमूल’च्या नेत्यांचे आयोगाच्या कार्यालयासमोर धरणे

दिल्लीत केंद्रीय निवडणूक आयोगाच्या मुख्यालयासमोर धरणे धरणाऱ्या तृणमूल काँग्रेसच्या डेरेक ओब्रायन, डोला सेन यांच्यासह पक्षाच्या १० नेत्यांना सोमवारी पोलिसांनी ताब्यात घेतले. केंद्रीय तपास यंत्रणांचा भाजप दुरुपयोग करत असल्याचा आरोप करत तृणमूलच्या शिष्टमंडळाने एकदिवसाचे लाक्षणिक आंदोलन सुरू केले होते. या आंदोलनाला परवानगी देण्यात आलेली नव्हती.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Controversy between congress and bjp over muslim league comment amy