या आठवडय़ाअखेर टाळेबंदीचा तिसरा टप्पा संपत असताना सोमवारी देशात करोनाच्या सर्वाधिक रुग्णांची नोंद झाली. गेल्या २४ तासांत करोनाचे ४,२१३ रुग्ण आढळले असून, एकूण रुग्णसंख्या ६७,१५२ झाली आहे. मात्र, करोनामुक्त रुग्णांची संख्या २६.५९ टक्क्यांवरून ३१.१५ टक्के झाल्याची माहिती केंद्रीय आरोग्य सहसचिव लव अगरवाल यांनी सोमवारी दिली.

देशभरात करोनाचे २०,१९७ रुग्ण बरे झाले आहेत. त्यातील १,५५९ गेल्या २४ तासांत करोनामुक्त झाले आहेत. करोनामुळे गेल्या २४ तासांत ९७ जणांचा मृत्यू झाला असून, मृतांचा एकूण आकडा २,२०६ वर पोहोचला आहे.

करोनाचे रुग्ण वाढत असले तरी समूह संसर्ग झालेला नाही. करोनाचे अनेक रुग्ण आढळलेली ठिकाणे प्रतिबंधित क्षेत्रे म्हणून जाहीर करण्यात आली आहेत. त्या विभागांमध्ये घराघरांत जाऊन चाचणी घेणे व प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाय योजणे गरजेचे असल्याचे अगरवाल यांनी सांगितले.

दहा राज्यांत रुग्णवाढ नाही : हर्षवर्धन

गेल्या चोवीस तासांमध्ये १० राज्ये व केंद्रशासित प्रदेशांमध्ये करोनाचा एकही रुग्ण आढळलेला नाही. यात अंदमान-निकोबार, अरुणाचल प्रदेश, दादरा-नगर हवेली, गोवा, जम्मू-काश्मीर, लडाख, मणिपूर, ओडिशा, मिझोराम आणि पुडुचेरी यांचा समावेश आहे. दीव-दमण, सिक्किम, नागालँड, लक्षद्वीप या केंद्रशासित प्रदेश व राज्ये आत्तापर्यंत करोनामुक्त राहिलेली आहेत. शनिवारी ८६ हजार चाचण्या करण्यात आल्या. चाचण्यांची क्षमता वाढवण्यात आली असून ती प्रतिदिन ९५ हजार झाली आहे. दिल्लीसह तमिळनाडू, आंध्र प्रदेश, तेलंगण, गुजरात, उत्तर प्रदेश, राजस्थान, मध्य प्रदेश राज्यांमध्ये केंद्रीय पथक पाठवण्यात आले आहे, अशी माहिती केंद्रीय आरोग्यमंत्री हर्षवर्धन यांनी सोमवारी पत्रकारांना दिली.

श्रमिक रेल्वेत आता १७०० प्रवासी : स्थलांतरित मजुरांचा प्रश्न तातडीने मार्गी लावण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला असून अधिकाधिक श्रमिक विशेष रेल्वेगाडय़ा सोडण्याची सूचना रेल्वे मंत्रालयाला करण्यात आली आहे. त्यामुळे अधिकाधिक मजुरांना प्रवास करता यावा यासाठी श्रमिक विशेष रेल्वेगाडय़ांचा वापर पूर्ण क्षमतेने केला जाणार आहे. आता एका डब्यात ५४ ऐवजी ७२ प्रवासी असतील. २४ डब्यांच्या रेल्वेगाडीत १२०० ऐवजी १७०० मजूर प्रवास करू शकतील. ही रेल्वेगाडी तीन स्थानकांवर थांबेल.