पीटीआय, वाराणसी
‘इंडिया’ आघाडीचे घटक पक्ष लोकांना जातीच्या नावावर भडकावत आहेत, असा आरोप पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी केला. ‘‘घराणेशाही असलेल्या पक्षांना दलित-आदिवासींची प्रगती होऊ द्यायची नाही. दलित-आदिवासींनी उच्च पदे भूषवणे त्यांना सहन होत नाही,’’ अशी टीकाही त्यांनी केली.
वाराणसीतील सीरगोवर्धन येथे संत रविदास यांच्या पुतळय़ाचे अनावरण केल्यानंतर पंतप्रधान मोदी बोलत होते. संत रविदास यांचा दोहा सांगून त्याचा अर्थ स्पष्ट करताना ते म्हणाले, की ‘‘बहुसंख्य लोक जाती-पातीच्या दुष्टचक्रात स्वत: अडकले आहेत तसेच ते दुसऱ्यालाही अडकवतात. जातीयवादाचा हा रोग मानवतेचे मोठे नुकसान करतो. घराणेशाही असलेल्या पक्षांची आणखी एक ओळख म्हणजे ते त्यांच्या कुटुंबाबाहेरील व्यक्तीला पुढे जाऊ देत नाहीत. कोणत्याही दलित-आदिवासीची प्रगती होऊ देत नाहीत. दलित-आदिवासींनी उच्च पदे भूषवणे त्यांना सहन होत नाही’’. यावेळी त्यांनी राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीचा संदर्भ दिला.
हेही वाचा >>>संदेशखालीमध्ये पुन्हा निदर्शने; पोलीस महासंचालकांचा दौरा, मानवाधिकार आयोगाकडून चौकशी
राहुल गांधी लक्ष्य
अन्य एका कार्यक्रमात पंतप्रधानांनी वाराणसीमधील १३ हजार कोटींच्या विकास प्रकल्पांचे उद्घाटन आणि पायाभरणी केली. घराणेशाही, भ्रष्टाचार आणि तुष्टीकरणाच्या राजकारणामुळे उत्तर प्रदेश अनेक वर्षे विकासात मागे राहिल्याचा आरोप त्यांनी केला. यावेळी जाहीर सभेत भाषण करताना मोदी यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांना लक्ष्य केले. ‘‘जे स्वत: शुद्धीत नसतात ते इतर तरुणांना व्यसनी म्हणत आहेत’’, अशी टीका त्यांनी राहुल यांचे नाव न घेता केली. वाराणसीमध्ये ‘भारत जोडो न्याय यात्रे’दरम्यान, राहुल यांनी शहरातील रस्त्यांवर मद्यधुंद तरुण दिसत असल्याची टिप्पणी केली होती.
गाडगेबाबांचे स्मरण
संत रविदास यांच्या पुतळय़ाच्या अनावरण प्रसंगी संत गाडगेबाबांच्या जयंतीनिमित्त मोदींनी त्यांना श्रद्धांजली वाहिली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे गाडगेबाबांचे प्रशंसक होते असे ते यावेळी म्हणाले. संत रविदास यांच्याप्रमाणे गाडगेबाबांनीही समाजसुधारणेसाठी आणि दलित व वंचितांच्या कल्याणासाठी खूप काम केले असे मोदी म्हणाले.
देशातील प्रत्येक दलित आणि प्रत्येक मागासलेल्या व्यक्तीने आणखी एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की, आपल्या देशात जातीच्या नावावर चिथावणी देणारे आणि भांडणे लावण्यावर विश्वास ठेवणारे ‘इंडिया’ आघाडीचे लोक दलित आणि वंचितांच्या हितासाठीच्या योजनांना कडाडून विरोध करतात. – नरेंद्र मोदी, पंतप्रधान