छत्तीसगड पोलिसांनी रायपूरमधून अंमली पदार्थांची तस्करी करणारे एक रॅकेट नुकतेच उध्वस्त केले. पोलिसांपासून वाचण्यासाठी आणि अवैध धंदे उघड होऊ नयेत म्हणून तस्करांनी मनी हाइस्ट वेबसीरीजमधील पात्रांची सांकेतिक नावे धारण केल्याचे या प्रकरणातून समोर आले आहे. अंमली पदार्थांची तस्करीत मुख्य सहभाग असलेल्या आयुष अग्रवाल नावाच्या २७ वर्षीय आरोपीने स्वतःला ‘प्रोफेसर’ असे सांकेतिक नाव दिले होते. नेटफ्लिक्सवरील मनी हाइस्य या मालिकेत ‘प्रोफेसर’ हे मुख्य पात्र होते.
छत्तीसगडच्या गुन्हे प्रतिबंधक आणि सायबर युनिटने स्थानिक पोलिसांसह केलेल्या संयुक्त कारवाईत ही रॅकेट उघडकीस आणले. रायपूरमधील धोत्रे मंगल कार्यालयाच्या एका खोलीतून आरोपींना पकडण्यात आले. पोलिसांना मिळालेल्या गूप्त माहितीच्या आधारे हा छापा टाकण्यात आला. ज्यामध्ये चार आरोपींना जेरबंद करण्यात आले. ज्यामध्ये एक महिला आणि एक आंतरराज्य पेडलर होता. हे सर्व आरोपी कोकेन आणि एमडीएमए या अंमली पदार्थांची तस्करी करत होते.
रस्त्यावर अंमली पदार्थाची विक्री होत असल्याच्या वृत्तानंतर सदर छापा टाकण्यात आला होता. या टोळीचा पर्दाफाश करण्यासाठी पोलिसांनी एक योजना आखली होती. पथकातील एका व्यक्तीने संभाव्य ग्राहक असल्याचा बनाव करत तस्कारांच्या जवळ जाण्याचा प्रयत्न केला. या माध्यमातून तस्करांची महत्त्वाची माहिती गोळा केली गेली.
सुरुवातीला कुसुम हिंदुजा (वय २३) आणि चिराग शर्मा (वय २५) या दोन आरोपींना अटक केली गेली. या आरोपींना अंमली पदार्थ विक्री करताना रंगेहात पकडण्यात आले. दोघांची चौकशी केल्यानंतर मनी हाइस्टबाबतची माहिती समोर आली. या मालिकेतील पात्रांपासून प्रेरीत होऊन आरोपींनी स्वतःची सांकेतिक नावे ठेवली होती. पोलिसांना गुंगारा देण्यासाठी ही शक्कल लढविल्याचे त्यांनी सांगितले.
दिल्लीतील रहिवासी असलेल्या महेश सिंह खडगा (वय २९) याने दिल्लीहून प्रतिबंधित असलेले अंमली पदार्थ छत्तीसगडमध्ये आणून ते आयुष अग्रवालला पुरविले. आरोपी आयुष अग्रवालने कुसुम हिंदुजा आणि चिराग शर्मा यांच्या माध्यमातून ते ग्राहकांपर्यंत पोहोचवले.
या छाप्यात पोलिसांनी १७ लहान पिशव्यातून २१०० मिलिग्रॅम एमडीएमए आणि ६६०० मिलिग्रॅम कोकेन जप्त केले. यासह एक डिजिटल इलेक्ट्रॉनिक वजनाचे मशीन, आठ मोबाइल फोन, ८६ हजारांची रोकड, तीन सोन्याच्या साखळ्या, एक लॅपटॉप, एक आयपॅड, तीन एटीएम कार्ड, एक सीम कार्ड आणि एक ऑडी कार जप्त केली. अंमली पदार्थ कायद्याच्या कलम २१ आणि २२ अन्वये आरोपीविरुद्ध कारवाई होणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.