नागपूर : दिवाळीनिमित्त दरवर्षीच मोठ्या प्रमाणात विविध सवलती जाहीर केल्या जातात. त्याचा गैरफायदा घेत राज्यभरात सायबर गुन्हेगार सक्रिय झाले असून फसव्या जाहिराती आणि लिंक पाठवून ते अनेकांची आर्थिक फसवणूक करीत आहेत.

बाजारपेठांमध्ये उसळणारी गर्दी, वाहनतळाची समस्या यामुळे अनेक जण दिवाळीत ‘ऑनलाइन’ खरेदीला प्राधान्य देतात. हीच संधी हेरून सायबर गुन्हेगारांनी ‘दिवाळी ऑफर्स’च्या नावाने फेसबुक, व्हॉट्सअॅप, इंस्टाग्राम, ट्विटर आणि अन्य समाजमाध्यमांवर फसव्या जाहिराती आणि ‘लिंक’ पाठवणे सुरू केले आहे. एका वस्तूवर दुसरी मोफत, खरेदीवर मोठी भेटवस्तू किंवा ‘लकी ड्रॉम’मध्ये हमखास कूपन देण्याचा दावा करून ग्राहकांना आकर्षित केले जात आहे. अशी लिंक मोबाइलवर पाठवून भेटवस्तू मिळविण्यासाठी ऑनलाइन अर्ज भरण्यास सांगितले जाते. त्यामध्ये नाव, मोबाइल क्रमांक, पॅन कार्ड आणि बँक खात्याची माहिती भरायची असते. भेटवस्तू मिळविण्याच्या नादात अनेक जण आपली खासगी माहिती सायबर गुन्हेगारांना देतात. त्यानंतर ‘ओटीपी’ मिळवून खात्यातून परस्पर पैसे वळते करतात.

हेही वाचा : वाशीममध्ये भाजपने भाकरी फिरवली, विद्यमान आमदाराचे तिकीट कापले; श्याम खोडे यांना संधी

दोन कोटींवर रक्कम गुन्हेगारांच्या खात्यात

गेल्या दोन वर्षांत सायबर गुन्हेगारांना ओटीपी, पासवर्ड सांगितल्यामुळे नागपुरातून दोन कोटी रुपयांवर रक्कम गुन्हेगारांच्या खात्यात गेली. फसवणूक केलेल्या सर्व ग्राहकांना सायबर गुन्हेगारांनी वेगवेगळी माहिती देऊन जाळ्यात ओढले व ग्राहकांच्या खात्यातून पैसे परस्पर वळते करण्यात आल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे.

हेही वाचा : राजुरा भोंगळे, ब्रह्मपुरी सहारे, तर वरोऱ्यात देवतळेंना उमेदवारी

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

फेसबुक, इंस्टाग्रामवर आलेल्या लिंकवर क्लिक करू नये. ‘दिवाळी ऑफर’च्या फसव्या जाहिरातीपासून सावध रहायला हवे. फसवणूक झाल्यास सायबर पोलीस ठाण्यात तक्रार करा. – लोहित मतानी, पोलीस उपायुक्त, सायबर क्राइम, नागपूर.