नवी दिल्ली : तंत्रज्ञान क्षेत्रातील आघाडीचे अमेरिकी उद्योजक एलॉन मस्क यांनी आपला नियोजित भारत दौरा लांबणीवर टाकला आहे. त्यांनी शनिवारी ‘एक्स’वरील संदेशाद्वारे भारत दौरा रद्द करण्याचे कारणही स्पष्ट केले आहे.  

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

‘‘दुर्दैवाने सध्या टेस्लाशी संबंधित मोठया जबाबदाऱ्यांमुळे मला नियोजित भारत दौरा लांबणीवर टाकणे आवश्यक आहे, पण मी या वर्षांच्या अखेरीस भारतात येण्यास उत्सुक आहे,’’ असे मस्क यांनी ‘एक्स’वरील संदेशात म्हटले आहे. टेस्लाच्या वित्तीय निकालासंबंधी बैठक (अर्निग्ज कॉल) मंगळवारी होणार असून मस्क यांना त्यासाठी उपस्थित राहणे आवश्यक आहे. त्यामुळे त्यांनी भारत दौरा पुढे ढकलला असावा, असे मानले जात आहे. नियोजित वेळापत्रकाप्रमाणे मस्क २१ आणि २२ एप्रिलला भारतात येणार होते. या दौऱ्यात ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचीही भेट घेणार होते. विनाचालक धावणाऱ्या कारची निर्मिती करणाऱ्या ‘टेस्ला’चे मस्क हे मुख्य कार्यकारी अधिकारी आहेत. त्यांची नियोजित भारतभेट गुंतवणुकीच्या दृष्टीने महत्त्वाची मानली जात होती.

हेही वाचा >>> अमेरिकेत भारतीय विद्यार्थ्याच्या मृत्यूला ब्लू व्हेल चॅलेंज कारणीभूत?

मस्क यांनी एप्रिलच्या प्रारंभी ‘एक्स’वर संदेश प्रसारित करून, आपण भारतात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेण्यास उत्सुक असल्याचे म्हटले होते.’’ गेल्या वर्षी जूनमध्ये मोदी अमेरिकेच्या दौऱ्यावर असताना मस्क यांनी त्यांची भेट घेतली होती. त्याचवेळी मस्क यांनी २०२४मध्ये भारताला भेट देण्याचा विचार असल्याचे म्हटले होते. तसेच ‘टेस्ला’ भारतीय बाजारपेठेत लवकरच प्रवेश करेल, असा विश्वासही व्यक्त केला होता.

द एशिया ग्रुप (टीएजी) या ‘टेस्ला’च्या सल्लागार प्रतिनिधींनी गुरुवारी नव्या धोरणावर चर्चा करण्यासाठी व्हिएतनामच्या ‘व्हिनफास्ट’ आणि भारतातील बडया वाहन उत्पादक कंपन्यांबरोबर बैठक घेतली होती. या धोरणानुसार, विद्युत-वाहनांसाठी उत्पादन सुविधा उभारणाऱ्या कंपन्यांना कमी सीमा शुल्क आकारून आठ हजार इतक्या मर्यादित संख्येत वाहने आयात करण्याची परवानगी दिली जाणार आहे.

पाच वर्षांच्या कालावधीसाठी किंमत, विमा आणि मालवाहतूकीसह एकत्रित मूल्य ३५ हजार डॉलर मर्यादेपर्यंत असणारी प्रवासी ई-वाहने उत्पादकांना सुरुवातीला १५ टक्के या सवलतीतील सीमा शुल्क दराने आयात केली जाऊ शकतात. सध्या ४० हजार डॉलरपेक्षा एकत्रित मूल्य असणाऱ्या आयात मोटारींवर किमतीच्या ७० टक्के ते १०० टक्के सीमा शुल्क आकारले जाते.

भारतभेटीचे महत्त्व

* या दौऱ्यात मस्क सॅटकॉम व्हेंचर ‘स्टारिलक’सह टेस्लाची भारतात विक्री करण्याची योजना जाहीर करण्याची शक्यता होती.

* ‘टेस्ला’च्या उत्पादनासाठी मस्क अब्जावधी डॉलरच्या गुंतवणुकीची योजना जाहीर करण्याची अपेक्षा होती. मात्र, त्यांची ‘स्टारिलक’ मंजुऱ्यांच्या प्रतीक्षेत.  

* टेस्ला कारची भारतात विक्री करण्यासाठी आयात शुल्क कमी करण्याची मागणी मस्क यांनी केली होती. केंद्र सरकारने नवे विद्युत वाहन धोरण जाहीर केल्यानंतर काही आठवडयांनी मस्क यांचा भारत दौरा जाहीर झाला होता.

*कमीतकमी ५० कोटी डॉलरची गुंतवणूक करून भारतात कारखाना उभारणाऱ्या कंपनीला आयातशुल्कात सवलत दिली जाणार आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Elon musk postpones trip to india due to very heavy tesla obligations zws