दिल्लीतील सामूहिक बलात्कारप्रकरणी सहा आरोपींपैकी दोन आरोपींनी माफीचे साक्षीदार होण्याच्या दाखविलेल्या तयारीस पीडित मुलीच्या कुटुंबीयांनी सोमवारी कडाडून विरोध व्यक्त केला. फाशीची शिक्षा टाळण्यासाठी केलेला हा बनाव असल्याचे त्यांनी म्हटले आहे. संबंधित मुलीच्या वडिलांनी सांगितले की, या खटल्यात पुरेसे पुरावे उपलब्ध असून, कोणाला तरी माफीचा साक्षीदार करण्याची गरज नाही. या आरोपींना कोणत्याही प्रकारे दयामाया दाखविता कामा नये. दरम्यान, संबंधित मुलीच्या मित्राने पोलिसांवर व सरकारी यंत्रणेवर केलेल्या आरोपांची चौकशी करण्याचे आदेश केंद्रीय गृह मंत्रालयाने सोमवारी दिले. सहसचिव पातळीवरील अधिकारी या आरोपांची चौकशी करेल.