गेल्या महिन्यामध्ये पश्चिम बंगालमधल्या बर्दवान येथील मिलन नावाचा 30 वर्षांचा तरूण मरण पावला. शेजाऱ्यांना वेगळीच विवंचना होती ती म्हणजे त्याच्या अंत्यसंस्कारांची. कारण मिलनला एकही नातेवाईक नव्हता, तो एकटाच होता, त्यामुळे त्याच्या अंत्यसंस्कारांचं काय हा प्रश्न निर्माण झाला होता. मात्र, हा प्रश्न मिलनच्या खास दोस्तानं सोडवला, राबी शेखनं.

शेजाऱ्यांना सुरूवातीला धक्काच बसला, कारण मुस्लीम व्यक्ती हिंदूचे अंत्यसंस्कार कसे करणार? कारम हिंदू पद्धतीनं हे संस्कार करायचे होते, परंतु राबीला काही फरक नाही पडला, ज्या काही प्रकारे अंत्यसंस्कार करावे लागतील त्या प्रकारे आपण करू याची त्यानं हमी दिली.
त्यानंतर मग मिलनच्या चितेला अग्नी देण्यापासून ते अकराव्या बाराव्याचे आदी विधी करेपर्यंत सगळ्या धार्मिक संस्कारांच्या बाबी राबीनं पूर्ण केल्या. मित्रापेक्षा धार्मिक भेद मोठा नाही हा धडाच राबीनं दिला.

राबी शेखचं हे मित्रप्रेम आणि त्यापोटी त्यानं केलेलं काम लवकरच या भागामध्ये चर्चेचा विषय झालं. विशेष म्हणजे ज्या हिंदू ब्राह्मणाला अंत्यसंस्कार करण्यासाठी पाचारण केलं होतं, तो ही भारावून गेला. अशा प्रकारची मैत्री बघायला मिळणं यासाठी भाग्य लागतं अशी प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली. धार्मिक भेदांच्या पेक्षाही उच्च पातळीवर असलेल्या मैत्रीचं दर्शन घडलं असून असं परत बघायला मिळेल की नाही याची शंकाच आहे असं मत त्यांनी आनंदबाझारपत्रिकाशी बोलताना व्यक्त केलं.

“आमच्या दोघांची खास मैत्री होती. गेल्या दहा वर्षांमध्ये असा एक दिवस गेला नसेल ज्यादिवशी आम्ही भेटलो नसू,” राबीनं आपल्या भावना व्यक्त केल्या. मिलनला कुणी नातेवाईकचं नव्हते त्यामुळे त्याला अंत्यसंस्कारांना मुकावं लागत होतं आणि ते मला होऊ द्यायचं नव्हतं. त्यामुळे त्याच्या निधनानंतर दहा दिवस जे काही हिंदू पद्धतीचे धार्मिक आचार पाळायचे असतात, ते ही आपण पाळल्याचे राबी म्हणाला. मे महिन्यात मिलनचा ह्रदयाच्या आजारात मृत्यू झाला. कुणी नातेवाईकच नसल्यामुळे बेवारस शवाप्रमाणे अंत्यसंस्कार करण्याचा निर्णय पोलिसांनी घेतला होता. मात्र, राबी पुढे झाला आणि त्यानं आपण अंत्यसंस्कार करणार असल्याचे सांगितले.