नेताजी सुभाषचंद्र बोस यांचा १९४५ साली विमान अपघातात मृत्यू झाल्याचे केंद्र सरकारने स्पष्ट केले असतानाच पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी यावरुन केंद्र सरकारवर टीकास्त्र सोडले आहे. केंद्र सरकारचा हा निर्णय एकतर्फी आहे. सरकारने दिलेली माहिती धक्कादायक असल्याचे ममता बॅनर्जींनी म्हटले आहे.

नेताजी सुभाषचंद्र बोस यांचा विमान अपघातात मृत्यू झाल्याचे केंद्र सरकारने म्हटले आहे. मात्र नेताजींचे पणतू आणि भारतीय जनता पक्षाचे नेते चंद्र बोस यांनी केंद्राचा दावा फेटाळला आहे. कोलकाताच्या एका व्यक्तीने माहिती अधिकारांतर्गत गृह मंत्रालयाकडे नेताजींच्या मृत्यूबाबत माहिती मागितली होती. माहितीच्या अधिकारात मिळालेल्या माहितीमध्ये नेताजींचा मृत्यू विमान अपघातात झाला असल्याचे सरकारचे म्हणणे असल्याचे गृहमंत्रालयाने आपल्या उत्तरात म्हटले.

१९४५ साली झालेल्या या विमान अपघातात नेताजी बचावले होते, असे अनेकांचे म्हणणे होते. त्यावर मंत्रालयाने आपल्या अहवालात म्हटले आहे की, शाहनवाज समिती, न्या. जी. डी. खोसला आयोग आणि न्या. मुखर्जी चौकशी आयोगाच्या अहवालांचा सरकारने अभ्यास केला होता. त्याचबरोबर नेताजी हे ‘गुमनामी बाबा’या वेषात राहत होते, हेही सरकारने फेटाळले आहे.

गुमनामी बाबा हे नेताजी सुभाषचंद्र बोस नव्हते, असे मुखर्जी आयोगाने म्हटल्याचे गृहमंत्रालयाने सांगितले. तसेच गृहमंत्रालयाच्या संकेतस्थळावर याबाबतची माहिती उपलब्ध आहे. ज्या अधिकाऱ्याने इतक्या बेजबाबदारपणे हे उत्तर दिले आहे, त्याच्याविरोधात त्वरीत कारवाई केली जावी, अशी मागणी चंद्र बोस यांनी केली आहे.

कोणत्याही ठोस पुराव्यांशिवाय सरकार नेताजींच्या मृत्यूबाबत एखाद्या निर्णयापर्यंत कसे पोहोचू शकते, असा सवालही त्यांनी विचारला. तर पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जींनीही यावर टीका केली आहे. कोणत्याही पुराव्यांविना, कोणत्याही गोष्टीची शहानिशा न करता सरकार हा निर्णय कसा देऊ शकते, असा सवाल बॅनर्जींनी उपस्थित केला आहे.