गांधीनगर ही गुजरातची अधिकृत राजधानी असली तरी या राज्याच्या शहरी समाजाचे आणि संस्कृतीचे प्रतिनिधित्व करते ते अहमदाबाद. दिवसाच्या कोणत्याही प्रहरी अहमदाबादच्या रस्त्यांवरून फिरताना या संस्कृतीचे दर्शन होते. मग ती येथील मंदिरे असोत, बाजार असोत की खाऊगल्ल्या. गुजराती माणसाच्या रंगरंगिल्या स्वभावाचे दर्शन या रस्त्यांवरून आणि त्यांच्या बोलण्यातून अगदी सहज जाणवते. राज्य सरकारच्या अनेक निर्णयांवर नाखूश असलेला गुजराती मतदार विषय निवडणुकांवर गेला की मात्र गोध्रा घटना आणि हिंदुत्वाविषयी बोलू लागतो. यावेळी दोन्ही प्रमुख पक्षांचे नेते मंदिर-मंदिर भटकत असल्याने बहुसंख्य मुस्लीम मतदार असलेल्या चार मतदारसंघात मात्र अस्वस्थ शांतता आहे.

अहमदाबादचे रस्ते पुण्याची आठवण करून देतात. चार पदरी रस्त्यावर कोणत्याही सिग्नलच्या कोणत्याही रंगाकडे न पाहता आणि मागून येत असलेल्या वाहनांना न जुमानता गाडी डावीकडून उजवीकडे नेण्याचे कसब असल्याशिवाय येथे गाडी चालवण्याचा परवाना देत नाहीत, असे म्हणतात. सार्वजनिक बससाठी वेगळा मार्ग आखला असूनही बसपेक्षा स्वतच्या गाडीने, रिक्षाने प्रवास करणे त्यांना स्टेटसला शोभणारे वाटते. त्यामुळेच रस्त्यांवर चालणाऱ्यांची संख्या अगदीच नाममात्र. शहरातील रस्ते चार पदरी असूनही सकाळ, संध्याकाळ या रस्त्यांवर वाहतूककोंडी असते. धिम्या गतीने गाडय़ा हाकताना आजुबाजूला दिसत असलेल्या मंदिराच्या कळसाकडे पाहत नमस्कार केला जातो. वर्षभर फक्त चनिया चोली विकणारी दुकाने आणि त्यासाठी गुजरातबाहेरून आलेल्या ग्राहकांची गर्दी येथे हमखास दिसते. रविवार हा फक्त सुट्टीचा आणि पेटपूजेचा वार. या दिवशी काम करण्याचा विचार दुकानदारांच्या मनालाही शिवत नसल्याने रविवारी दुपारनंतर बहुतांश दुकानांचे शटर बंद होते आणि मग जत्रा भरते ती खाऊगल्ल्यांमध्ये. लिंबूरसासोबत, कांदा, टोमॅटो, फरसाण शिवरून साध्या तिखट पोह्य़ांचे केलेले लाड आणि काजू घातलेली पावभाजी इथे अगदी सहज खपून जातात. अशा रंगरंगिल्या अहमदाबादमध्ये सध्या निवडणुकीचे वारे वाहताहेत. दोन दशकांपूर्वी शहरी भागात भाजपला पाय रोवण्याची संधी अहमदाबादने दिली. तेव्हापासून अहमदाबाद भाजपच्या बाजूने उभा राहिला आहे. फक्त भाजपला पाहायची आणि नरेंद्र मोदी यांना ऐकण्याची सवय झालेल्या इथल्या रहिवाशांना यावेळी काँग्रेस आणि हार्दिकच्या रॅलीबद्दलही तेवढीच उत्सुकता होती. सोमवारी अहमदाबादमधील पाटीदारांनी हार्दिकच्या रोड शोसाठी प्रचंड गर्दी केली होती. काँग्रेसने यावेळी भाजपला स्पर्धा दिली असल्याचे ते सरळ सांगतात. गेल्या २० वर्षांत अहमदाबादमध्ये सुधारणा झाल्या असल्या तरी नोटबंदी व त्यानंतरच्या जीएसटीमुळे नागरिकांचे हाल झाले. त्याबाबत ते सरकारवर नाराजही आहेत. मात्र ही नाराजी हिंदुत्वाच्या मुद्दय़ापेक्षा मोठी होत नसल्याचे त्यांच्या बोलण्यातून जाणवते. पूर्वी येथे रथयात्रा निघाल्या की त्यावर जोरदार दगडफेक होई. एकदोघांचा मृत्यू ठरलेलाच. मात्र गेली १५ वर्षे सर्व शांत आहे. येथून आतापर्यंत २४ रथयात्रा निघाल्या, मात्र एकावरही दगडफेक झाली नाही. चार दिवसांपूर्वी जुलूसही तेवढय़ाच मोठय़ा प्रमाणात निघाला होता. ही शांतता राहावी असे वाटते, असे जेव्हा पहाटे पाच वाजता थंडीमध्ये कुडकुडत रेल्वेस्थानकाकडे घेऊन जाणारा रिक्षावाला सांगतो तेव्हा ते अहमदाबादेतील रहिवाशांचे प्रातिनिधिक उद्गार ठरतात.

जागा वाढविण्याचा काँग्रेसचा प्रयत्न

अहमदाबादमधील १६ मतदारसंघांपैकी १४ जागा भाजपकडे तर दोन जागा काँग्रेसकडे होत्या. या १६ जागांपैकी जमालपूर- खाडिया, दरियापूर, दाणीलिंबडा आणि वेजलपूर हे चार मतदारसंघ मुस्लिमबहुल आहेत. मात्र २००८ मध्ये मतदारसंघांची पुनर्रचना झाल्यावर कोणत्याही मतदारसंघात मुस्लिमांची संख्या उमेदवार निवडीत मोलाची ठरणार नाही याची काळजी घेतल्याचे कायदे चळवळीतील कार्यकर्ता अन्वर शेख यांचे म्हणणे आहे. अहमदाबादमधील पाटीदारबहुल मतदारसंघांमध्ये हार्दिकच्या सभांमुळे काँग्रेसची हवा असली तरी शहरी मतदार टिकवण्यासाठी गेला महिनाभर भाजपच्या कार्यकर्त्यांनी कंबर कसली आहे. अहमदाबादच्या ग्रामीण मतदारसंघात वीरमगाम, साणंद, ढोलका, धंदोका आणि दसकोई हे पाच मतदारसंघ येतात. यातील दोन मतदारसंघ काँग्रेसकडे तर तीन भाजपकडे होते. यावेळी पाटीदार, दलित, ओबीसी यांच्या सहकार्याने या जागा वाढवण्यासाठी काँग्रेसने प्रयत्न सुरू ठेवला आहे.