‘डेरा सच्चा सौदा’चा प्रमुख गुरमित राम रहिम सिंगचा खरा चेहरा जगासमोर आणून सीबीआयकडे तक्रार करण्याचे धाडस दाखवणाऱ्या महिलेने न्यायालयाच्या निकालावर प्रतिक्रिया दिली आहे. ‘मला आज न्याय मिळाला, मी गुरमित राम रहिमला घाबरत नाही’ असे पीडित महिलेने म्हटले आहे.

गुरमित राम रहिम सिंगला सीबीआयच्या विशेष न्यायालयाने दोषी ठरवत २० वर्ष तुरुंगवासाची शिक्षा सुनावली. न्यायालयाच्या या निकालावर गुरमित राम रहिमविरोधात तक्रार दाखल करणाऱ्या महिलेने प्रतिक्रिया दिली. ‘द हिंदू’ या इंग्रजी वृत्तपत्राला महिलेने मुलाखत दिली. पीडित महिला विवाहित असून तिने एका शेतकऱ्याशी लग्न केले आहे. या महिलेला दोन मुलेदेखील आहेत. न्यायालयातील सुनावणीचा प्रसंग सांगताना ती म्हणाली, ‘२००९ मध्ये न्यायालयात सुनावणीसाठी गेले होते. माझी साक्ष घेतली जात असताना डेरा समर्थक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. डेरा समर्थक शस्त्र घेऊनच न्यायालयात यायचे. पण तेव्हा आणि आत्तादेखील मी गुरमित राम रहिमला घाबरत नाही’ असे पीडितेने सांगितले.

पीडित महिला डेरा सच्चा सौदाच्या महाविद्यालयात शिक्षण घेत असताना तिच्यावर गुरमित राम रहिमने बलात्कार केला होता. पीडितेचा भाऊ हा गुरमित राम रहिमचा भक्त होता. मात्र त्याचीदेखील राम रहिमने हत्या केल्याचा आरोप आहे. पीडितेच्या भावानेच बहिणीवर झालेल्या अत्याचाराला वाचा फोडली. त्यानेच न्यायालयाला पत्र पाठवले असा संशय गुरमित राम रहिमला होता. सीबीआयने गुन्हा दाखल केल्यापासून पीडित महिलेला पोलीस संरक्षण देण्यात आले आहे. गेल्या आठवड्यापासून महिलेच्या घराबाहेरील बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. ‘प्रदीर्घ लढ्यानंतर आज मला न्याय मिळाला’ असे पीडितेने सांगितले.

वृत्तवाहिनीवर बघितला निकाल
डेरा सच्चा सौदाचे राम रहिमचे समर्थक न्यायालयात मोठ्या प्रमाणात हजर असायचे. त्यामुळे २००९ नंतर पीडित महिला सुनावणीसाठी न्यायालयात गेली नाही. तिचे वडील न्यायालयात सुनावणीसाठी जायचे. सोमवारी पीडित महिला सकाळपासून वृत्तवाहिनी बघत होती. निकाल येताच तिने समाधान व्यक्त केले.

१९ पैकी फक्त २ महिलांनी दिला जबाब
निनावी पत्राच्या आधारे तपास करणाऱ्या सीबीआयने आश्रमातील १९ महिलांना बाबा राम रहिमविरोधात जबाब देण्यासाठी राजी केले. मात्र यातील फक्त २ महिलांनीच प्रत्यक्षात तक्रार नोंदवली.