Pune Porsche Crash Latest Updates: पुण्यातल्या अल्पवयीन गर्भश्रीमंत मुलाने पोर्श कारने अनिश अवधिया आणि अश्विनी कोस्टा या दोघांना धडक दिली. त्या धडकेत या दोघांचा मृत्यू झाला. रविवारी पहाटेच्या सुमारास ही घटना घडली. या प्रकरणात या मुलाला जामीनही मिळाला ज्याचे पडसादही राजकीय वर्तुळात आणि समाजात उमटले. ज्यानंतर आता विविध प्रतिक्रिया समोर येत आहेत. अनिशच्या आईने मुलाचा मृतदेह पाहून आक्रोश केला. आता अनिशच्या आईची संतप्त प्रतिक्रिया समोर आली आहे.

अल्पवयीन मुलाची रवानगी बालसुधारगृहात

कल्याणीनगर अपघात प्रकरणातील अल्पवयीन मुलाची पाच जूनपर्यंत बालसुधारगृहात रवानगी करण्यात आली आहे. बाल न्याय मंडळाने याबाबतचे आदेश बुधवारी रात्री दिले.बाल न्याय मंडळाचे प्रमुख दंडाधिकारी एम. पी. परदेशी, सदस्य डॉ. एल. एन. धनवडे, के. टी. थोरात यांच्या मंडळासमोर सुनावणी झाली. बुधवारी दिवसभर या प्रकरणावर सुनावणी झाली होती. सुनावणी झाल्यानंतर मंडळाने निकाल राखून ठेवला होता. रात्री आठच्या सुमारास बाल न्याय मंडळाने निकाल दिला. त्यानंतर मुलाची बालसुधारगृहात रवानगी करण्यात आली.

Pune Porsche Accident:पोर्श धडकेत जागीच मृत्यू झालेल्या अश्विनीच्या वडिलांची सून्न करणारी प्रतिक्रिया, “आमची स्वप्नं..”

नेमकी काय घटना घडली?

मद्यधुंद अवस्थेत ताशी १६० किमीच्या वेगाने पोर्श कार चालवत बांधकाम व्यावसायिकाच्या अल्पवयीन मुलाने अनिश आणि अश्विनी यांना धडक दिली. ही धडक इतकी जोरात होती की अश्विनीचा जागीच मृत्यू झाला. तर अनिशला रुग्णालयात नेण्यात आलं पण तिथे डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं. अनिश अवधिया हा २४ वर्षांचा तरुण होता. पुण्यात त्याने इंजिनिअरिंग केलं होतं. तसंच मागच्या काही वर्षांपासून आयटी विभागात काम करत होता. या अपघातानंतर त्याच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. त्यानंतर त्याचे वडील ओमप्रकाश अवधिया यांनी पोलीस आम्हाला सहकार्य करत नसल्याचं म्हटलं आहे. तर अनिशच्या आईने माझ्या मुलाची हत्या केली असं म्हटलं आहे.

काय म्हटलं आहे अनिशच्या आईने?

“त्याने (अल्पवयीन कोट्यधीश मुलगा) माझ्या मुलाची हत्या केली आहे. माझा मुलगा मला कायमचा दुरावला आहे. मी त्याला आता कधीही भेटू शकणार नाही. त्या मुलाची चूक आहे. याला हत्याच म्हणावं लागेल. कारण त्या मुलाने एवढी मोठी चूक केली नसती तर माझ्या मुलाचा जीव गेला नसता. त्याच्या कुटुंबाने जर त्याला अशा प्रकारे वेगात कार चालवण्यास मनाई केली असती तर माझा मुलगा आज जिवंत असता. त्या मुलाने माझ्या मुलाची (अनिश अवधिया) हत्या केली आहे.” असं अनिशची आई सविता अवधिया यांनी म्हटलं आहे.

अल्पवयीन मुलाला कठोरातली कठोर शिक्षा झाली पाहिजे

सविता अवधिया पुढे म्हणाल्या, “ज्याने माझ्या मुलाची हत्या केली त्याला कठोरातली कठोर शिक्षा व्हायला हवी. ते पैसेवाले लोक आहेत, त्यांना वाटत असेल की आमच्या मुलाने काहीही केलं तरीही त्याला आपण सोडवू मात्र माझ्या मुलाचा जीव गेला आहे. त्यामुळे त्याची हत्या करणाऱ्या अल्पवयीन मुलाला कठोर शासन झालंच पाहिजे. अनिशने फोनवर मला सांगितलं होतं आई तुझ्यासाठी दुबईहून गिफ्ट आणलं आहे. मी लवकरच घरी येऊन तुला ते देतो. पण तो येऊच शकला नाही.” असंही सविता अवधिया म्हणाल्या आणि त्यांनी ज्या मुलाने धडक दिली त्या मुलाला कठोर शिक्षा झाली पाहिजे अशी मागणी केली.