पीटीआय, कोलकाता

पश्चिम बंगालमधील संदेशखाली भागात लैंगिक अत्याचाराचा व जमीन बळकावण्याचा आरोप असलेला तृणमूल काँग्रेसचा नेता शहाजहान शेख याला अटक करण्याचे निर्देश कलकत्ता उच्च न्यायालयाने सोमवारी पोलिसांना दिले, तसेच त्याच्या अटकेवर कुठलीही स्थगिती नसल्याचे स्पष्ट केले.

 संदेशखालीतील अत्याचारांच्या घटनांची माहिती राज्य पोलिसांना चार वर्षांपूर्वीच देण्यात आली होती हे कळल्याने आपल्याला आश्चर्य वाटले असे न्यायालय म्हणाले. ‘४२ प्रकरणांमध्ये आरोपपत्र दाखल होण्यास चार वर्षे लागली हे आणखी आश्चर्यकारक आहे’, असेही मुख्य न्यायाधीश टी.एस. शिवज्ञानम व न्या. हिरण्मय भट्टाचार्य यांच्या खंडपीठाने सांगितले.

हेही वाचा >>>सिंहाचं नाव अकबर अन् सिंहिणीचं नाव सीता ठेवल्याच्या वादात मोठी कारवाई; त्रिपुराच्या ‘त्या’ अधिकाऱ्याला केले निलंबित

 शेख याच्या अटकेला न्यायालयाने स्थगिती दिली असल्याची चुकीची समजूत पसरवण्यात आली असल्याचे या प्रकरणातील काही वकिलांनी लक्षात आणून दिले आहे. मात्र, अशाप्रकारची कुठलीही स्थगिती दिलेली नाही असे न्यायालयाने स्पष्ट केले. दरम्यान, शाहजहान शेखला एका आठवडय़ाच्या आत अटक केली जाईल असे तृणमूल काँग्रेसकडून सांगण्यात आले.