scorecardresearch

हिंदुत्ववाद्यांचा विरोध झुगारून कुराण पठण करत बेलूर मंदिरात रथोत्सवाची सुरूवात; परंपरा अबाधित

हिंदुत्ववाद्यांचा विरोध झुगारून कर्नाटकच्या धर्मादाय प्रशासनाने कुराण पठणाने चेन्नकेशव मंदिराच्या रथोत्सवाची सुरुवात करण्याची परंपरा कायम ठेवलीय.

कर्नाटकमध्ये सध्या धार्मिक तणावाची स्थिती निर्माण झालीय. अनेक मंदिरांच्या ठिकाणी मुस्लीम व्यावसायिकांना मंदिराबाहेर दुकानं लावण्यास मनाई केली जात आहे. या पार्श्वभूमीवर कर्नाटकमधील बेलूरच्या प्रसिद्ध चेन्नकेशव मंदिर येथे रथोत्सवाची सुरुवात कुराण पठणाने करण्याच्या ऐतिहासिक परंपरेलाही हिंदुत्ववाद्यांनी विरोध केला. मात्र, हा विरोध झुगारून कर्नाटकच्या धर्मादाय प्रशासनाने कुराण पठणाने चेन्नकेशव मंदिराच्या रथोत्सवाची सुरुवात करण्याची परंपरा अबाधित ठेवलीय. यावेळी मोठा पोलीस फौजफाटा तैनात करण्यात आला होता.

हिंदुत्ववाद्यांनी सुरुवातीला प्रशासनाकडे आणि मंदिर व्यवस्थापनाकडे चेन्नकेशव मंदिराच्या रथोत्सवाची सुरुवात कुराण पठाणाने करण्याची परंपरा बंद करण्याची मागणी केली. मात्र, धर्मादाय विभागाने ही मागणी फेटाळत कुराण पठणाने रथोत्सवाची सुरुवात करण्याची परंपरा कायम ठेवली. कर्नाटकमधील धार्मिक तणावाच्या पार्श्वभूमीवर सुरुवातीला चेन्नकेशव मंदिर व्यवस्थापनाने मंदिर उत्सवात मुस्लीम व्यावसायिकांना दुकानं न लावण्यास सांगितल्याने गोंधळही निर्माण झाला होता. मात्र, यानंतर प्रशासनाने मंदिर व्यवस्थापनाला गैरहिंदू व्यावसायिकांना देखील उत्सवात सहभागी होऊ देण्याचे निर्देश दिले.

“पुजाऱ्यांशी चर्चा करून परंपरा कायम ठेवण्याचा निर्णय”

अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, “अनेक वर्षांपासून चेन्नकेशव मंदिर रथोत्सवाची सुरुवात कुराणमधील काही भाग वाचून करण्याची परंपरा आहे. मात्र, यावर्षी मंदिर व्यवस्थापनाने मुस्लीम व्यावसायिकांना मंदिराबाहेर दुकानं लावण्यापासून रोखत नोटीस काढली. त्यामुळे काहिसा गोंधळ निर्माण झाला. यानंतर धर्मादाय विभागाने वेगवेगळ्या पुजाऱ्यांशी चर्चा करून ही परंपरा कायम ठेवण्याचा निर्णय घेतला.”

प्रशासनाकडून उत्सवाला कडक पोलीस बंदोबस्त

चेन्नकेशव मंदिराच्या वार्षिक उत्सवाची सुरुवात बुधवारी (१३ एप्रिल) झाली. हा उत्सव दोन दिवस चालतो. या उत्सवात सहभागी होण्यासाठी राज्यातील विविध भागांतून शेकडो लोक येथे येतात. मात्र, यावर्षी हिंदुत्ववादी संघटनांनी प्रशासन आणि मंदिर व्यवस्थापनाकडे उत्सवात मुस्लीम व्यावसायिकांना दुकानं लावू न देण्याची मागणी केली. ही मागणी प्रशासनाने फेटाळली. तसेच मंदिर व्यवस्थापनाला अशी बंदी न घालण्याचे निर्देश दिले. त्यामुळेच प्रशासनाने उत्सवाला कडक पोलीस बंदोबस्त पुरवला आहे.

हेही वाचा : कर्नाटकातल्या हिंदू मंदिराबाहेर मुस्लिमांच्या दुकानांवर बंदी; संतप्त भाजपा नेत्यांचा सरकारला घरचा आहेर; म्हणाले, “हा वेडेपणा…”

वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलीस प्रशासनाच्या सुरक्षेनंतर चेन्नकेशव मंदिर रथोत्सवात आता १५ मुस्लीम दुकानदारांनी आपली दुकानं लावली आहेत.

मराठीतील सर्व देश-विदेश ( Desh-videsh ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Historical tradition of rathotsav start with quran recitation continue in chennkeshav temple belur karnataka pbs

ताज्या बातम्या