Karala Google Map : केरळमध्ये सध्या जोरदार पाऊस पडतोय. अनेक ठिकाणी पूरसदृष्य स्थिती निर्माण झाली आहे. पावसामुळे राज्यात अनेक ठिकाणी वेगवेगळ्या दुर्घटना घडल्या असून यात ११ जणांचा बळी गेला आहे. अशातच केरळमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. दक्षिण केरळ जिल्ह्यातील कुरुप्पनताराहून दुसऱ्या ठिकाणी प्रवास करणारी एक कार खोल कालव्यात कोसळली आहे. या कारमधून चालकासह इतर प्रवासी प्रवास करत होते. कारचा चालक गुगल मॅप्सच्या सहाय्याने प्रवास कार चालवत होता. मात्र गुगल मॅप्सवरील चुकीची माहिती, अंधूक प्रकाश आणि पावसाच्या पाण्याखाली बुडालेल्या रस्त्यामुळे त्यांची कार पाण्यात पडली. कारमधील चारही प्रवासी हे मूळचे हैदराबादचे असून ते केरळमध्ये फिरण्यासाठी आले होते.

दरम्यान, या घटनेबाबत माहिती देताना पोलिसांनी सांगितलं की “या पर्यटकांना आम्ही पाण्यातून सुरक्षितपणे बाहेर काढलं आहे. परंतु, त्यांची कार पाण्यात बुडाली आहे. ही घटना शुक्रवारी (२४ मे) मध्यरात्री घडली होती. हे चारजण कारने अलाप्पुझाला जात होते.”

पोलिसांनी सांगितलं की, ज्या रस्त्याने हे चार पर्यटक प्रवास करत होते त्या रस्त्यावर नाल्याचं पाणी साचलं होतं. तसेच या पर्यटकांसाठी हा परिसर आणि इथले रस्ते नवे असल्यामुळे त्यांनी गुगल मॅप्सची मदत घेतली. गुगल मॅप्सच्या सहाय्याने ते कार चालवत होते. दरम्यान, त्यांची कार खोल पाण्यात कोसळली. रस्त्यावर नाल्याचं पाणी साचलेलं पाणी आणि अंधार दाटलेला असल्यामुळे त्यांना रस्त्या दिसला नाही. त्यामुळेच त्यांच्या कारचा अपघात झाला.

या भागात गस्तीवर (पेट्रोलिंग युनिट) असलेलं पोलीस पथक आणि स्थानिक नागरिकांनी मिळून या चारही पर्यटकांना सुखरूप पाण्यातून बाहेर काढलं. मात्र त्याची कार पाण्यात बुडाली. कडुथुरुती पोलीस ठाण्यातील अधिकाऱ्यांनी सांगितलं की, “त्या पर्यटकांची कार पाण्यातून बाहेर काढण्याचे प्रयत्न चालू आहेत.”

हे ही वाचा >> स्वतःची अधुरी प्रेमकहाणी सांगत कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांकडून तरुणांना आंतरजातीय विवाहास प्रोत्साहन; म्हणाले, “मी महाविद्यालयात…”

केरळमधील ही अशा प्रकारची पहिलीच घटना नाही. गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये दोन तरुण डॉक्टरांच्या कारचा असाच अपघात झाला होता. या अपघातात दोघेही जागीच ठार झाले होते. हे डॉक्टर गुगल मॅप्सचा वापर करून प्रवास करत होते. त्याच वेळी त्यांची कार नदीत कोसळली होती.