छत्तीसगडमधील फटाक्यांच्या सर्वात मोठ्या कारखान्यात शनिवारी (२५ मे) सकाळी मोठा स्फोट झाला. या स्फोटानंतर काराखान्याला आग लागली आणि बघता बघता मोठा भडका उडाला. कारखान्यासह आसपासच्या परिसरात आग पसरली. बेमेतरा जिल्ह्यापासून ७० किलोमीटर दूरवर असलेल्या बोरसी गावात ही घटना घडली आहे. या स्फोटात एका व्यक्तीचा बळी गेला असून काराखान्यातील कर्मचाऱ्यांसह इतर काही लोक जखमी झाले आहेत. जिल्हा प्रशासनाशी संबधित एका अधिकाऱ्याने पीटीआय या वृत्तसंस्थेला सांगितलं की बेरला डेव्हलपमेंट एरियातील पिरंदा गावाजवळ असलेल्या कारखान्यात हा स्फोट झाला आहे.

या स्फोटात आतापर्यंत सहा जण जखमी झाले आहेत. जखमींना उपचारासाठी जवळच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. या स्फोटाची माहिती मिळताच अग्निशमन दलाचं पथक घटनास्थळी दाखल झालं आहे. ही आग अग्निशमन दलाच्या पथकाने नियंत्रणात आणली आहे. मात्र आगीचं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नही. एसडीआरएफ आणि पोलिसांची पथकंदेखील घटनास्थळी दाखल झाली आहेत. अग्निशमन दल आणि पोलिसांनी आता बचाव मोहीम हाती घेतली आहे. जखमींना रुग्णालयात नेण्यासाठी कारखान्याबाहेर रुग्णवाहिका उभ्या करण्यात आल्या आहेत. आग इतकी मोठी होती की, आगीचे मोठमोठे लोळ दिसत होते. हा स्फोट इतका मोठा होता की त्याचा आवाज आसपासच्या गावांमध्येदेखील ऐकू आला होता.

हे ही वाचा >> स्वतःची अधुरी प्रेमकहाणी सांगत कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांकडून तरुणांना आंतरजातीय विवाहास प्रोत्साहन; म्हणाले, “मी महाविद्यालयात…”

या स्फोट आणि आगीच्या दुर्घटनेत अनेकांचा बळी गेलेला असण्याची शक्यता स्थानिकांनी वर्तवली आहे. कारण स्फोट झाला तेव्हा कर्मचारी कारखान्यातच होते. बचाव मोहिमेत काही मृतदेह सापडू शकतात. स्फोटामुळे आणि आगीच्या मोठमोठ्या लोळांमुळे आसपासच्या रहिवासी भागात मोठं नुकसान झालं आहे. लोकांच्या घरांच्या आणि दुकानांच्या काचा फुटल्या आहेत. आता कारखान्यातील मलबा दूर करण्याचं काम चालू आहे. दरम्यान, स्फोटाचा आवाज आणि आग पाहून आसपासच्या गावांमधील रहिवाशांमध्ये घबराट पसरली आहे.