“भारताच्या दक्षिणेकडे राहणारे लोक आफ्रिकन लोकांसारखे तर ईशान्य भारतातील लोक हे चीनी लोकांप्रमाणे दिसतात”, असं राहुल गांधींचे राजकीय सल्लागार सॅम पित्रोदा यांनी म्हटलंय. त्यांच्या या वक्तव्याचे देशभरातून पडसाद उमटत आहेत. यावरून केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनीही सॅम पित्रोदा यांच्यावर टीका केली आहे.

“मी दक्षिण भारतीय असून मी भारतीय दिसते. माझ्या टीममध्ये ईशान्य भारतातील उत्साही सदस्य आहेत. तेही भारतीय दिसतात. पश्चिम भारतातील माझे सहकारीही भारतीय दिसतात”, असं निर्मला सीतारमण म्हणाल्या.

“पण राहुल गांधींचे वर्णद्वेषी सल्लागार यांच्यामते आम्ही अफ्रिकन, चिनी, अरब आणि गोरे आहोत. तुमची विचारसरणी आणि प्रवृत्ती दर्शवल्याबद्दल धन्यवाद”, अशी टीका निर्मला सीतारमण यांनी केली.

नरेंद्र मोदींनीही केली टीका

“आपल्या त्वचेचा रंग कोणताही असो, आपण भगवान श्रीकृष्णाची पूजा करणारे लोक आहोत. मला पित्रोदा यांच्या विधानाचा खूप राग आला आहे. आज जे लोक संविधानाचं रक्षण करण्याच्या गोष्टी करतात, तेच लोक आज त्वचेच्या रंगावरून भारतीय जनतेचा अपमान करत आहेत”, अशी प्रतिक्रिया पंतप्रधान मोदी यांनी दिली.

हेही वाचा >> सॅम पित्रोदांच्या ‘त्या’ विधानावरून पंतप्रधान मोदींचं राहुल गांधींवर टीकास्र; म्हणाले, “काँग्रेसच्या युवराजांना…”

“विरोधकांकडून जेव्हा मला शिवीगाळ केली जाते, तेव्हा ती मी सहन करू शकतो. परंतू माझ्या देशातील जनतेला कोणी काही म्हटलं, तर ते मला सहन होत नाही. आज त्वचेच्या रंगावरून आपण एखाद्या व्यक्तीची गुणवत्ता ठरवू शकत नाही” असेही ते म्हणाले.

काँग्रेसची प्रतिक्रिया काय?

सॅम पित्रोदा यांच्या वक्तव्यामुळे काँग्रेसवर टीका होत असताना यावर आता काँग्रेसने स्पष्टीकरण दिलं आहे. काँग्रेसचे वरिष्ठ नेते जयराम रमेश यांनी पित्रोदा यांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया देणारी एक पोस्ट एक्स या मायक्रोब्लॉगिंग प्लॅटफॉर्मवर शेअर केली आहे. जयराम रमेश यांनी म्हटलं आहे की, सॅम पित्रोदा यांनी एका पॉडकास्टमध्ये भारतातलं वैविध्य सांगताना ज्या प्रकारची तुलना केलीय ते दुर्दैवी आणि स्वीकारण्यासारखं आहे. भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचा अशा उपमा आणि वक्तव्यांशी कोणताही संबंध नाही.

हेही वाचा >> “दक्षिण भारतीय लोक आफ्रिकन…”, सॅम पित्रोदांच्या वक्तव्यावर काँग्रेसची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “अशी उपमा…”

सॅम पित्रोदा नेमकं काय म्हणाले होते?

द स्टेट्समनला दिलेल्या मुलाखतीमध्ये भारताच्या लोकशाहीबाबत बोलताना, दक्षिणेतील लोक आफ्रिकन नागरिकांसारखे दिसतात, असं विधान सॅम पित्रोदा यांनी केलं होतं. “मागच्या ७५ वर्षात भारतातील लोक गुण्यागोविंदाने एकत्र नांदत आले आहेत. याकाळात काहीसे मतभेद झाले असतील पण ते तेवढ्यापुरतेच होते. भारतात एका बाजूला ईशान्येकडील लोक चीनी दिसतात, पश्चिमेकडची लोक अरबांसारखी दिसतात, तर उत्तर भारतातील लोक कदाचित गोऱ्या पाश्चात्य लोकांसारखी आणि दक्षिणेतील लोक आफ्रिकन नागरिकांसारखे दिसतात. तरीही त्याचा आपल्या जगण्यावर काहीही परिणाम झालेले नाही. आपण सर्वच बंधू आणि भगिनींप्रमाणे एकत्र नांदत वैविध्यपूर्ण देश एकत्र ठेवू शकलो. आपण सर्वच विविध भाषांचा, विविध धर्मांचा, संस्कृती आणि खाद्य परंपरेचा सन्मान करत आलो आहोत. हा भारत देश आहे, ज्यावर आपल्या सर्वांचा विश्वास आहे”, असे ते म्हणाले होते.