केंब्रिज विद्यापीठातील वैज्ञानिकाचा दावा

आक्र्टिक गेल्या एक लाख वर्षांत यावर्षी किंवा पुढील वर्षी प्रथमच सागरी बर्फातून मुक्त होईल असा दावा एका ख्यातनाम वैज्ञानिकाने केला आहे. यूएस नॅशनल स्नो अँड आइस डाटा सेंटर या संस्थेच्या माहितीनुसार १ जून अखेर आक्र्टिकमध्ये ११.१ दशलक्ष चौरस किलोमीटर सागरी बर्फ होता. गेल्या तीस वर्षांत तो सरासरी १२.७ दशलक्ष चौरस किलोमीटर असायचा. हा फरक १.५ दशलक्ष चौरस किलोमीटरचा असून तो भाग ब्रिटनच्या सहा पट इतका क्षेत्रफळाने आहे. केंब्रिज विद्यापीठातील पोलस ओशन फिजिक्स ग्रुपचे प्रमुख प्रा. पीटर व्ॉडहॅम्स यांच्या मते चार वर्षांपूर्वी आपण केलेले भाकित यावेळी खरे ठरणार आहे. आक्र्टिकचे बर्फ हे नष्ट होईल असे भाकित मी केले होते व सप्टेंबर अखेर १० लाख चौरस किलोमीटर भागातील बर्फ वितळलेले असेल. बर्फ पूर्ण नष्ट झाले नाही तरी ते कमी असण्याचे हे आणखी एक विक्रमी वर्ष असेल. ते ३.४ दशलक्ष चौरस किलोमीटरपेक्षा कमी असेल. यावर्षी बर्फ कमी होण्याची शक्यता आहे. या वर्षी नाही तरी पुढील वर्षी आक्र्टिकमधील बर्फ नष्ट होईल. बर्फमुक्त याचा अर्थ आक्र्टिक व उत्तर ध्रुवाचा मधला भाग बर्फमुक्त असेल. बाकीचा बर्फ हा आक्र्टिक क्षेत्राच्या आसपास असलेल्या व कॅनडाच्या उत्तर किनाऱ्यावरील बेटांवर अडकून राहील. यापूर्वी १ लाख ते १ लाख २० हजार वर्षांपूर्वी आक्र्टिक बर्फमुक्त झाला होता. ध्रुवीय प्रदेशात तापमानवाढ होते आहे, टोकाचे हवामान परिणाम बॉम्ब सायक्लोनच्या रूपात दिसतात. अमेरिकेत वादळे व पूर आले. ब्रिटनमध्ये पूर आले. रशियाच्या उथ्तर किनाऱ्यावर पाण्यावरचे बर्फ नष्ट झाले त्यामुळे सागरी जल तापत गेले. वैज्ञानिकांच्या मते मिथेन वायू गोठलेल्या भागातून बुडबुडय़ाच्या रूपात दिसला आहे. नेचर या नियतकालिकात प्रा. व्ॉडहॅम व इतरांनी म्हटले आहे की, पाच वर्षांत ०.६ अंश सेल्सियस तापमानवाढ होऊ शकते व ते फार धोकादायक आहे. कमी बर्फ म्हणजे सूर्याची जास्त ऊर्जा पृथ्वी शोषून घेईल. बर्फ नष्ट होईल तेव्हा सगळी स्थिती बदलेल. आक्र्टिकमधील बर्फ सप्टेंबरमध्ये कमी असते व नंतर हिवाळ्यात ते पुन्हा साठते. हवामानतज्ज्ञ डॉ. पीटर ग्लेक यांनी सांगितले की, व्ॉडॅहॅम यांचे भाकित खरे ठरेल की नाही हे मी सांगू शकत नाही. जर ते खरे ठरले नाही तर हवामान बदल विरोधकांची वैज्ञानिकांवरील टीका वाढेल.