जयपूर : आगामी राज्यसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतांची फाटाफूट टाळण्यासाठी काँग्रेसने राजस्थानमधील आपल्या आमदारांना उदयपूरमधील ताज आरवली रिसॉर्टमध्ये ठेवले असून त्यापासून दूर राहिलेल्या सहा आमदारांनीही रविवारी तेथे हजेरी लावली. या आमदारांना येथे हजर होण्यासाठी पक्षाने दिलेली मुदत उलटून दोन दिवस झाल्यानंतर रविवारी मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी त्यांच्याशी चर्चा केली. त्यानंतरच हे आमदार तेथे पोहोचले. यात एका मंत्र्याचाही समावेश आहे.   

१० जून रोजी राज्यसभेची निवडणूक होत आहे. काँग्रेसच्या आमदारांची मते फोडण्यासाठी विरोधकांनी प्रयत्न करू नयेत म्हणून त्यांना रिसॉर्टवर ठेवण्यात आले आहे. गेहलोत यांनी समजूत काढल्यानंतर पक्षाचे हे सहा विधिमंडळ सदस्य एका खासगी विमानातून उदयपूरमध्ये आले. त्यांच्यासोबत मुख्यमंत्री गेहलोतसुद्धा होते. दुपारी एकच्या सुमारास ते तेथे पोहोचले.

दरम्यान पक्षाचे मुख्य प्रतोद आणि मंत्री महेश जोशी यांनी रविवारी राज्यातील भ्रष्टाचारप्रतिबंधक विभागाला पत्र लिहून राज्यसभा निवडणुकीत घोडेबाजार होत असल्याच्या आरोपांची चौकशी करण्याची मागणी केली आहे. यातून पक्षातील संभाव्य फुटीर आमदारांवर दबाव टाकण्याचा सरकारचा हेतू असल्याचे मानले जाते.  २०२० मध्ये सुद्धा जोशी यांनी राज्यातील विशेष कारवाई विभागाकडे अशीच तक्रार केली होती. त्यावेळी गेहलोत सरकार पाडण्यासाठी आर्थिक बळाने आमदार फोडण्याचा प्रयत्न केला जात होता, असा आरोप आहे.    

जोशी म्हणाले की, राज्यसभा निवडणुकीसाठी राजस्थानमध्ये घोडेबाजार होण्याची शक्यता असल्याचे विविध वृत्तवाहिन्या आणि समाजमाध्यमांतून होणाऱ्या चर्चातून दिसत आहे. राजस्थानमध्ये भ्रष्टाचार सहन केला जात नाही. भ्रष्टाचार प्रतिबंधक विभागाने आजवर केलेल्या कारवायांतून याची प्रचिती येते.

उद्योगपती रिंगणात कशासाठी- गेहलोत

घोडेबाजाराच्या आरोपांबाबत आणि भ्रष्टाचारप्रतिबंधक विभागाकडे केलेल्या तक्रारीबाबत मुख्यमंत्री गेहलोत यांनी पत्रकारांना  सांगितले की, घोडेबाजार होईल असे वातावरण मोठय़ा प्रमाणावर तयार करण्यात आले आहे.  जेव्हा एखादा मोठा उद्योगपती रिंगणात येतो, तेव्हा तुम्हाला माहित आहे, तो कशासाठी येतो. भाजपकडे आवश्यक तेवढी सदस्यसंख्या नाही, तर मग त्यांना तेवढी मते कशी मिळणार आहेत? मी एवढेच सांगू इच्छितो की आमच्या पक्षात एकी आहे, आमचे तीनही उमेदवार निवडून येतील.