पीटीआय, लखनऊ

‘इंडिया आघाडी’ला देशातील बहुसंख्य समाजाला द्वितीय श्रेणीचे नागरिक बनवायचे आहे आणि धर्माच्या आधारावर आरक्षण देण्यासाठी राज्यघटनेचे पुनर्लेखन करण्याची योजना त्यांनी आखली आहे, असा आरोप पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला. उत्तर प्रदेशातील पूर्वांचल प्रदेशातील घोसी येथे एका जाहीर सभेला संबोधित करताना पंतप्रधान मोदी यांनी विरोधकांवर जोरदार टीका केली. एससी, एसटी, ओबीसी यांना दिलेले आरक्षण संपवून ते सर्व मुस्लिमांना दिले जाईल, असा आरोप पंतप्रधानांनी केला.

समाजवादी पक्ष आणि काँग्रेसवर टीका करताना मोदी म्हणाले की, त्यांनी गेल्या अनेक वर्षांपासून पूर्वांचलकडे दुर्लक्ष केले आहे. माफिया, गरिबी आणि असहायतेचा प्रदेश असे रूपांतर या प्रदेशाचे केले. जनतेचे लक्ष वास्तविक मुद्द्यांपासून वळवण्यासाठी समाजवादी पक्ष आणि काँग्रेस जातींना आपापसांत लढायला लावत आहेत, जेणेकरून समाज कमकुवत होईल, असा आरोप पंतप्रधानांनी केला.