नवी दिल्ली : इराणमधून अलीकडेच मायदेशी परतलेल्या गझियाबादमधील एका व्यक्तीला करोना विषाणूची लागण झाल्याचे स्पष्ट झाल्याने देशात करोनाची लागण झालेल्यांची संख्या आता ३० वर पोहोचली आहे. जिल्हा, गट आणि ग्रामस्तरावर शीघ्र प्रतिसाद पथके स्थापन करण्याच्या सूचना सरकारने गुरुवारी राज्यांना दिल्या आहेत.

तेलंगणमधील दोघांच्या रक्ताचे नमुने तपासणीसाठी पुण्याच्या राष्ट्रीय विषाणूशास्त्र संस्थेत पाठविण्यात आले होते, मात्र त्यांना करोनाची लागण झाली नसल्याचा अहवाल आला आहे. बुधवापर्यंत इटालीतील१६ पर्यटकांसह २९ जणांना करोनाची लागण झाल्याचे आढळले होते. केरळमध्ये गेल्या महिन्यात तीन जणांना लागण झाली होती त्यांचाही यामध्ये समावेश आहे. हे तीन जण पूर्ण बरे झाल्यानंतर त्यांना घरी पाठविण्यात आले.

दरम्यान, गुरगावमध्ये काम करणाऱ्या आणि दिल्लीच्या पश्चिम भागात राहणाऱ्या पेटीएम कर्मचाऱ्याच्या संपर्कात आलेल्या पाच जणांच्या रक्ताची चाचणी घेण्यात आली असून त्याचा अहवाल येईपर्यंत त्यांना स्वतंत्र कक्षात ठेवण्यात येणार आहे, असे दिल्ली सरकारच्या आरोग्य अधिकाऱ्यांनी सांगितले. पेटीएमचा हा कर्मचारी गुरगावमधील ९१ जणांच्या संपर्कात आला होता. करोनाची लागण टाळण्यासाठी दिल्लीतील सर्व प्राथमिक शाळा ३१ मार्चपर्यंत बंद ठेवण्याची घोषणा उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांनी केली आहे.