काही महिन्यांपूर्वी लाहोर येथील कारागृहात पाकिस्तानी कैद्यांच्या मारहाणीत मृत्युमुखी पडलेला भारतीय नागरिक सरबजित सिंगच्या वस्तू परत कराव्यात, अशी मागणी भारताने पाकिस्तानकडे केली आहे.
सरबजितची कारागृहातच हत्या झाल्यानंतर त्याचे कपडे आणि वस्तू तेथेच राहिल्या आहेत. त्या वस्तू परत मिळाव्यात, असे भारत सरकारने पाकिस्तानला लेखी स्वरूपात कळविले आहे. याशिवाय कारागृहात काम करून सरबजितने कमावलेले पैसेही भारताच्या ताब्यात द्यावेत, असे भारताने कळविले आहे.
सरबजितची बहीण दलबिर कौर यांनी या वस्तू परत मिळण्याबाबत गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्याकडे गेल्या महिन्यात विनंती केली होती. त्यामुळे भारत सरकारने तातडीने याबाबत पाकिस्तान सरकारशी पत्रव्यवहार केला आहे.
सरबजितच्या मूळ गावी त्याचे स्मारक उभारण्यात येणार आहे. या स्मारकात सरबजितने पाकिस्तानच्या कारागृहात कमावलेले पैसे आणि त्याच्या वस्तू जतन करून ठेवण्यात येणार असल्याचे दलबिर कौर यांनी सांगितले.