PM Narendra Modi speaks with Jordan King Abdullah-II : संपूर्ण जगाचं लक्ष इस्रायल-हमास युद्धाकडे लागलं आहे. जगातल्या अनेक शक्तीशाली राष्ट्रांचे प्रमुख या युद्धावर लक्ष ठेवून आहेत. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हेदेखील इस्रायल-हमास युद्धावर बारीक लक्ष ठेवून आहेत. गाझा पट्टीतल्या लोकांसाठी मानवतावादी मदत पाठवल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या युद्धाबाबत जॉर्डनच्या राजाशी बातचीत केली. या संवादावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इस्रायलवर हमासने केलेल्या हल्ल्याला दहशतवादी हल्ला म्हटलं आहे. तसेच गाझातल्या रुग्णालयात घडवून आणलेल्या बॉम्बस्फोटाचा निषेध नोंदवला. पंतप्रधान मोदी यांनी इस्रायलवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांच्याशी संवाद साधला होता. तसेच या युद्धात भारत इस्रायलबरोबर असल्याचा संदेश नेतान्याहू यांना दिला होता. त्यानंतर गाझातल्या रुग्णालयात झालेल्या स्फोटानंतर मोदी यांनी पॅलेस्टाईनचे नेते महमूद अब्बास यांच्याशी फोनवरून बातचीत केली होती. पंतप्रधान मोदी यांनी दोन्ही नेत्यांशी बोलताना भारताची भूमिका स्पष्ट केली. दहशतवादाचा निषेध आणि शांततेचं समर्थन हीच या युद्धातली भारताची भूमिका आहे, असं मोदी यांनी महमूद अब्बास यांना सांगितलं. दरम्यान जॉर्डनच्या राजाशी केलेल्या चर्चेदरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुरक्षा आणि मानवतेवरील संकट दूर करण्यासाठी ठोस प्रयत्न करण्यावर जोर दिला. जॉर्डनचे राजे अब्दुल्ला द्वितीय यांच्याशी केलेल्या संभाषणात मोदी यांनी दहशतवाद आणि हिंसा कमी करण्यावर तसेच नागरिकांचे प्राण वाचवण्यावर भर देण्यावर भाष्य केलं. हे ही वाचा >> हमासकडून दोन वृद्ध इस्रायली महिलांची सुटका, २२० नागरिक अजूनही सुटकेच्या प्रतीक्षेत दुसऱ्या बाजूला सौदी अरबने हमासला या युद्धादरम्यान भारताकडून शिकण्याचा सल्ला दिला आहे. सौदीच्या गुप्तहेर संघटनेचे माजी संचालक म्हणाले, आम्ही पॅलेस्टाईनमध्ये सुरू असलेल्या लष्करी कारवाईचं समर्थन करत नाही. त्यांनी भारतातल्या सविनय कायदेभंग चळवळीचा दाखला दिला. या चळवळीनेच भारतातलं ब्रिटीश साम्राज्य उलथून टाकलं होतं, असं सांगत सौदीच्या गुप्तहेर संघटनेच्या माजी संचालकांनी हमासला भारताच्या या चळवळीकडून काहीतरी शिका असा सल्ला दिला आहे.