चांद्रयान ३ च्या यशानंतर सूर्याचा अभ्यास करण्यासाठी आदित्य एल १ हे अवकाश यान यशस्वीपणे अंतराळात पाठवण्यात आलं. या दोन खास मोहिमांच्या यशामुळे इस्रोचे प्रमुख एस. सोमनाथ यांना आदित्य एल १ च्या लाँचिंगच्या दिवशीच कॅन्सरचं म्हणजे कर्करोगाचं निदान झालं. एस सोमनाथ यांनी एका मुलाखतीत हा खुलासा केला आहे. ज्या दिवशी देशाच्या अंतराळ संशोधातला इतिहास घडवला जात होता त्याच दिवशी एस. सोमनाथ यांना कर्करोगाचं निदान झालं.

एस सोमनाथ यांनी मुलाखतीत काय सांगितलं?

सोमनाथ म्हणाले, चांद्रयान ३ मोहिमेच्या प्रक्षेपणाच्या वेळेस काही आरोग्याच्या तक्रारी जाणवत होत्या. मात्र तोपर्यंत काय झालं आहे याचं निदान झालं नव्हतं. या सगळ्यानंतर आदित्य एल १ च्या लाँचिंगचा दिवस उजाडला. त्या दिवशी कॅन्सर असल्याचं समजलं. हा रिपोर्ट आल्याने मी आणि माझं कुटुंब चिंतेत होतं. तसंच माझ्या सहकाऱ्यांना जेव्हा ही गोष्ट कळली तेव्हा त्यांनाही धक्का बसला. पण अशा आव्हानात्मक परिस्थिती मी स्वतःला आणि सहकाऱ्यांना सावरलं.

एस सोमनाथ यांना पोटाचा कर्करोग

आदित्य एल १ च्या लाँचिंगच्या दिवशीच पोटाचा कॅन्सर असल्याचं सोमनाथ यांना कळलं. त्यादिवशी त्यांचा स्कॅन रिपोर्ट आला होता. २ सप्टेंबर २०२३ रोजी भारताची पहिली सूर्य मोहिम ‘आदित्य एल १’ चा प्रवास सुरू झाला. त्याच दिवशी सोमनाथ नियमीत तपासणीसाठी गेले होते. या तपासणी दरम्यान त्यांच्या पोटाचा कॅन्सर असल्याचे समजले.

आरोग्य विभागाची राज्यात ३५ जिल्ह्यांत डे-केअर केमोथेरपी केंद्र! टाटा कर्करोग केंद्राबरोबर सामंजस्य करार…

कर्करोगाचं निदान झाल्यानंतर सोमनाथ चेन्नईला गेले आणि तिथे पुढच्या तपासण्या केल्या. त्यानंतर सोमनाथ यांनी केमो थेरेपी घेतली. त्यांच्यावर एक शस्त्रक्रियाही करण्यात आली आहे. “मी न घाबरता उपचार केले. तेव्हा मी पूर्णपणे बरा होईन का याची खात्री नव्हती. मी रुग्णालयात दाखल झालो आणि उपचार सुरू झाले. प्रत्यक्षात मी यातून एखाद्या चमत्काराप्रमाणे बाहेर आलो. फक्त ४ दिवस रुग्णालयात काढल्यानंतर मी पुन्हा इस्रोचे काम हाती घेतले. पाचव्या दिवशी मला कोणत्याही वेदना होत नव्हत्या. आता मी नियमीतपणे तपासणी आणि स्कॅन करतो. माझी प्रकृती आता व्यवस्थित असून कामही सुरू आहे, असे सोमनाथ यांनी सांगितले.