जनता परिवार आणि जनता दलातील जुन्या नेत्यांना पुन्हा एकत्रित आणण्याचे जोरदार प्रयत्न सुरू असल्याच्या पाश्र्वभूमीवर येत्या रविवारी मेरठमध्ये एका जाहीर सभेसाठी बिहारचे माजी मुख्यमंत्री नितीशकुमार आणि जद(यू)चे अध्यक्ष शरद यादव आणि राष्ट्रीय लोकदलाचे नेते अजितसिंग एकाच व्यासपीठावर एकत्र येणार आहेत.
रविवारी सांयकाळीच शरद यादव आणि नितीशकुमार हे हरियाणात भारतीय राष्ट्रीय लोकदलाच्या नेत्यांसमवेत निवडणुकीचा प्रचार करणार आहेत.
जद(यू)ने माजी मुख्यमंत्री ओमप्रकाश चौताला यांच्या नेतृत्वाखालील भारतीय राष्ट्रीय लोकदल पक्षाला विधानसभा निवडणुकीत पाठिंबा जाहीर केला आहे.
जद(यू)चे नेते शरद यादव यांनी बुधवारी सपाचे नेते मुलायमसिंह यादव यांच्यासमवेत एकाच व्यासपीठावर हजेरी लावून दोन्ही पक्षांमध्ये आघाडी होणार असल्याच्या शक्यतांना खतपाणी घातले होते. पेचप्रसंगाच्या काळात समाजवादी विचारसरणीच्या नेत्यांनी ऐक्य दर्शविले आहे, असेही या वेळी ते म्हणाले होते.
जनता परिवारातील कार्यकर्त्यांना ऐक्य हवे आहे, जुन्या जनता दलाचे नेते एकत्रित यावे ही कार्यकर्त्यांची इच्छा आहे, सर्व पक्षांच्या नेत्यांवर कार्यकर्त्यांचा दबाव येत आहे, परंतु आपल्याला नेत्यांना एकत्रित आणावयाचे आहे. तथापि, एकमेकांबद्दल विश्वासाचे वातावरण कसे निर्माण करावयाचे हा मोठा प्रश्न आहे, असे यादव म्हणाले.