भ्रष्टाचाराचे आरोप केल्यानंतर त्यांनाच पक्षात प्रवेश देण्याचं धोरण भाजपानं अवलंबल्याचा आरोप विरोधकांकडून केला जात आहे. यासंदर्भात गेल्या काही महिन्यांमध्ये झालेल्या भाजपा प्रवेशांची उदाहरणंही विरोधकांकडून दिली जात आहेत. गेल्या काही महिन्यांत काँग्रेस, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस अशा अनेक विरोधी पक्षांमधून नेते, आमदार, खासदारांचे भाजपामध्ये प्रवेश झाले आहेत. त्याचाच संदर्भ देत आता JMM अर्थात झारखंड मुक्ती मोर्चा या पक्षानं भाजपाबाबत मोठा दावा केला आहे. गेल्या दहा वर्षांत देशभरातील इतर पक्षांमधल्या किमान ७४० खासदार-आमदारांनी भाजपामध्ये प्रवेश केल्याचा आरोप करण्यात आला आहे.

झारखंड मुक्ती मोर्चाचे सरचिटणीस सुप्रियो भट्टाचार्य यांनी सोमवारी रांचीमध्ये बोलताना या मुद्द्यावरून भारतीय जनता पक्षाला लक्ष्य केलं. “२०१४ ते २०२४ या काळात देशामध्ये अनेक अजब गोष्टी घडल्याचं दिसून आलं आहे. अगदी काय खावं, परिधान करावं, अभ्यास करावा, अगदी काय ऐकावं यासंदर्भातही सूचना, आदेश देण्यात आले आहेत. सत्ताधाऱ्यांच्यामते विरोधात असणारे सगळे भ्रष्ट आहेत. भाजपामध्ये असणारे सगळे धुतल्या तांदळासारखे आहेत. त्यांनी हेही म्हटलंय की जे सरकारच्या धोरणांना विरोध करतात, ते राष्ट्रविरोधी आहेत”, असं सुप्रियो भट्टाचार्य पत्रकार परिषदेच म्हणाले.

दहा वर्षांत किती भाजपाप्रवेश?

सुप्रियो भट्टाचार्य यांच्या पत्रकार परिषदेसंदर्भातलं वृत्त पीटीआयनं दिलं आहे. त्यात त्यांनी केलेल्या दाव्यानुसार गेल्या दहा वर्षांत विरोधी पक्षांमधून एकूण ७४० आमदार-खासदारांनी भाजपात प्रवेश केल्याची माहिती समोर आली आहे. “गेल्या १० वर्षांत ७४० खासदार-आमदारांनी भाजपामध्ये प्रवेश केला आहे. यातले बहुतांश सदस्य हे काँग्रेसमधले होते. विशेष म्हणजे या सगळ्यांवर भाजपानं प्रत्यक्ष वा अप्रत्यक्षपणे भ्रष्टाचाराचे आरोप केले होते. आता हेच लोक त्यांचे आवडते झाले आहेत”, अशा शब्दांत सुप्रियो भट्टाचार्य यांनी भाजपावर टीकास्र सोडलं.

“..तर मोदी म्हणतील, चिखलफेक परवडली पण ही वरळीची गटारं आवरा”, ठाकरे गटाचा टोला!

“माय वे ऑर हाय वे”

दरम्यान, भट्टाचार्य यांनी भारतीय जनता पक्षानं अहंकारी वृत्तीचं धोरण राबवायला सुरुवात केल्याचा आरोप केला. “माय वे ऑर हाय वे असं धोरण भाजपानं राबवलं आहे. झारखंड हे त्याचं उत्तम उदाहरण आहे. ते म्हणतात की आदिवासींचा सन्मान ही त्यांच्यासाठी प्राधान्याची बाब आहे. पण त्यांना आदिवासी मुख्यमंत्री मात्र नको आहे. जर आदिवासी मुख्यमंत्री झालाच, तर त्याची तुरुंगात रवानगी केली जाईल”, अशी टीका भट्टाचार्य यांनी भाजपावर केली.