देशाला हादरवून सोडणा-या कठुआ सामूहिक बलात्कार प्रकरणाची आज सीजेएम कोर्टात पहिली सुनावणी होणार आहे. दरम्यान, पीडितेच्या वकील दीपिका सिंह राजावत यांनी आपल्यासोबतही बलात्कार अथवा आपला खून होऊ शकतो अशी शंका व्यक्त केली आहे. जम्मू-काश्मीरबाहेर हे प्रकरण ट्रान्सफर केलं जावं अशी मागणीही त्यांनी केली आहे.

तुला माफ केलं जाणार नाही अशी धमकी मला मिळत आहे. मला कोर्टात प्रॅक्टिस करण्यापासून रोखलं जात आहे, बार असोसिएशनही साथ देत नाहीये. मुस्लिम समाजाच्या युवतीच्या न्यायासाठी लढत असल्यामुळे मला हिंदू धर्मातून काढण्याच्याही चर्चा सुरू आहेत. माझ्यासोबतही बलात्कार अथवा माझीही हत्या होऊ शकते, असं राजावत म्हणाल्या.

जम्मू-काश्मीरबाहेर हे प्रकरण ट्रान्सफर करण्याच्या मागणीसाठी पीडितेचं कुटुंबिय सर्वोच्च न्यायालयात धाव घेणार आहे. आरोपींना मिळत असलेल्या पाठिंब्यामुळे पीडितेचं कुटुंबिय दहशतीखाली आहे.

कठुआमध्ये ८ वर्षांच्या मुलीसोबत बलात्कार आणि खून प्रकरणाची सुनावणी आजपासून सुरू झाली. ८ आरोपींविरोधात ही सुनावणी होणार आहे.