केरळच्या वायनाड लोकसभा मतदारसंघामध्ये काँग्रेस नेते राहुल गांधी आणि केरळ भाजपाचे प्रदेशाध्यक्ष के सुरेंद्रन यांच्यात लढत होत आहे. भाजपा आणि काँग्रेसचा जोरदार प्रचार सुरु आहे. अशातच वायनाड लोकसभा मतदारसंघात असलेल्या सुलतान बथेरी शहराचे नाव बदलण्याचा मुद्दा भाजपाने समोर आणला आहे. प्रदेशाध्यक्ष के सुरेंद्रन यांनी निवडणुकीच्या प्रचारादरम्यान यावर भाष्य केले.

“सुलतान बथेरी शहराचे खरे नाव गणपतीवट्टम हे आहे. त्यामुळे सुलतान बथेरी हे नाव बदलले गेले पाहिजे. आपण येथून निवडून आल्यास सुलतान बथेरी शहराचे नाव बदलून गणपतीवट्टम असे करण्यास आपले प्राधान्य राहील”, असे विधान भाजपा प्रदेशाध्यक्ष के सुरेंद्रन यांनी केले. त्यांच्या या विधानावर आता विरोधी पक्षाच्या नेत्यांकडून टीका होत आहे.

“सुलतान बथेरी हे नाव बदलणे अनिवार्य आहे. कारण दोन दशकांपूर्वी म्हैसूरचे त्यावेळचे शासक टिपू सुलतान यांच्या आक्रमणानंतर हे नाव पडले. या शहराचे नाव हे टिपू सुलतान यांच्या नावावरून पडले आहे. मात्र, आजही काँग्रेसचे नेते या शहराला सुलतान बथेरी म्हणणेच पसंत करतात. पण केरळमधील अशा ठिकाणाला आक्रमकाचे नाव का द्यावे?”, असा प्रश्न के सुरेंद्रन यांनी केला. या संदर्भातील वृत्त इंडियन एक्सप्रेसने दिले आहे.

हेही वाचा : “…तर पंतप्रधान मोदींसह भाजपा नेत्यांना तुरुंगात टाकू”; मीसा भारती यांचे विधान, भाजपानेही दिलं प्रत्युत्तर; म्हणाले…

भाजपाच्या नेत्यांचे म्हणणे आहे की, “हे ठिकाण म्हैसूरच्या राजवटीपूर्वी गणपतीवट्टम म्हणून ओळखले जात होते. मात्र, दोन शतकांपूर्वी केरळच्या मलबार प्रदेशावर आक्रमण झाल्यानंतर हे नाव बदलण्यात आले.” दरम्यान, आता केरळ भाजपाच्या प्रमुख नेत्यांनी वायनाडमधील सुलतान बथेरी शहराचे नाव बदलण्याच्या केलेल्या मागणीमुळे वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.

यावर बोलताना केरळ काँग्रेसचे नेते, आमदार टी सिद्धकी म्हणाले, “के सुरेंद्रन हे काहीही बोलू शकतात. मात्र, ते वायनाड लोकसभा मतदारसंघामधून निवडून येणार नाहीत. आता ते जे बोलत आहेत ते फक्त त्यांच्याकडे लक्ष केंद्रीत करण्यासाठी बोलत आहेत.”