पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांनी भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांच्याबद्दल केलेल्या वक्तव्याच्या समर्थनार्थ काँग्रेसजन पुढे सरसावले आहेत. काँग्रेसचे मोदी यांच्याबद्दल जे मत आहे त्याच भावनांना मृदू स्वभावाच्या डॉ. सिंग यांनी वाट करून दिली आहे, असे केंद्रीय मंत्री सलमान खुर्शीद यांनी म्हटले आहे.
आम्हाला काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांच्याबद्दल अंत:करणापासून जे वाटते आणि नरेंद्र मोदी यांच्याबद्दल ज्या कटू भावना आहेत त्याच पंतप्रधानांनी व्यक्त केल्या आहेत, असे खुर्शीद यांनी म्हटले आहे. काँग्रेसजनांमध्ये ज्या भावना आहेत त्या पंतप्रधानांनी व्यक्त केल्याने काँग्रेस त्यांचा ऋणी आहे, असेही ते म्हणाले.
भ्रष्टाचाराच्या काही घटनांमध्ये दोषी आढळलेल्यांना वाचवल्याचा प्रयत्न पंतप्रधांनी केल्याचा आरोप माकपचे  नेते सीताराम येचुरी यांनी केला आहे.

धोके लक्षात घेऊन अमेरिकेच्या दूतावासाची सुरक्षा पूर्ववत-खुर्शीद
देवयानी खोब्रागडे प्रकरणानंतर भारत सरकारने काढून घेतलेली अमेरिका दूतावासाची सुरक्षा गुरुवारी पूर्ववत करण्यात आली. मात्र हा निर्णय परस्पर नव्हे, तर संभाव्य धोके लक्षात घेऊन घेतलेला आहे, अशी कबुली परराष्ट्र व्यवहारमंत्री सलमान खुर्शीद यांनी दिली. खुर्शीद यांच्या या वक्तव्यामुळे भारताने अमेरिकेपुढे नमते घेतले असल्याचे दिसून येत आहे. देवयानी खोब्रागडे प्रकरण राजनैतिक मार्गाने सोडावण्यात येईल. भारत आणि अमेरिका ही दोन्ही राष्ट्रे चर्चेअंती या प्रकरणावर तोडगा काढतील, असे खुर्शीद यांनी सांगितले. भारताच्या अमेरिकेतील महावाणिज्यदूत देवयानी खोब्रागडे यांना अटक केल्याने भारताने या कठोर कारवाईच्या निषेधार्थ अमेरिकेच्या दूतावासातील अधिकाऱ्यांचे काही अधिकार कमी केले होते. अमेरिकी दूतावासाची सुरक्षाही कमी करण्यात आली होती.