सुरुवातीपासूनच वादाच्या भोवऱ्यात सापडलेला तामिळनाडूमधील कुडनकुलम अणुऊर्जा प्रकल्पाचा पहिला टप्पा पुढील महिन्यात सुरू हाईल, अशी ग्वाही पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांना दिली.
येथे सुरू असलेल्या ब्रिक्स परिषदेदरम्यान मंगळवारी रात्री उशिरा दोन्ही नेत्यांनी वेळ काढून चर्चा केली. या वेळी कुडनकुलम प्रकल्प कार्यान्वित करण्याबाबतचे आश्वासन पंतप्रधानांनी पुतीन यांना दिले. कुडनकुलम विभाग-१ पुढील महिन्याभरात सुरू होणार असून तिसऱ्या आणि चौथ्या टप्प्यालाही सर्व  मंजुऱ्या देण्यात आल्या असून दोघांच्या सहकार्यातून तेदेखील कार्यान्वित होतील, असा विश्वास पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी पुतीन यांना दिला.
या बैठकीला पंतप्रधानांसमवेत अर्थमंत्री पी. चिदम्बरम, वाणिज्यमंत्री आनंद शर्मा आणि राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार शिवशंकर मेनन आदी उपस्थित होते.
गेल्या वर्षी जपानमधील फुकुशिमा येथील अणुऊर्जा प्रकल्पातील दुर्घटनेनंतर या प्रकल्पाविरोधातील वातावरण अधिक चिघळले असून सुरुवातीपासूनच स्थानिक ग्रामस्थांनी या अणुऊर्जा प्रकल्पाला विरोध केल्यामुळे तो वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे.
दोन्ही देशांमधील द्विपक्षीय आर्थिक सहकार्याबाबत बोलताना मनमोहन सिंग म्हणाले की, सध्याच्या परिस्थितीबाबत दोन्ही देश समाधानी नसून संबंध अधिकाधिक बळकट करण्यावर भर आहे.
दरम्यान, गेल्या वर्षी भारतभेटीदरम्यान पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी केलेल्या प्रेमळ स्वागताबद्दल पुतीन यांनी आभार मानले तसेच येत्या सप्टेंबरमध्ये सेंट पिटसबर्ग येथे होणाऱ्या जी-२० परिषदेसाठी पंतप्रधान मनमोहन सिंग आवर्जून रशियाला येतील अशी आशा त्यांनी यावेळी व्यक्त केली.
रशियाबरोबरचे संबंध सुदृढ करण्यावर आपला नेहमीच भर राहिला असून रशियाच्या अध्यक्षांना भेटण्याची संधी वाया घालवणार नाही, असे पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी सांगितले.
रशियाबरोबरचे संबंध बळकट करण्यासाठी राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांना रशियाच्या सुरक्षा सल्लागाराशी सातत्याने संपर्क ठेवण्यास सांगितल्याचीही माहिती सिंग यांनी दिली.

मनमोहन सिंग-झी जिनपिंग भेटीबबत चीन आशादायी
भारताचे पंतप्रधान मनमोहन सिंग आणि चीनचे अध्यक्ष झी जिनपिंग यांची दरबान येथे चर्चा होणार असून या चर्चेमुळे उभय देशांमधील द्विपक्षीय विश्वास आणि सहकार्य वाढस लागेल, अशी आशा चीनने व्यक्त केली. उभय नेत्यांची प्रथमच भेट होत आहे.
चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते हाँग लेई यांनी ‘ब्रिक्स’ (ब्राझील, रशिया, भारत, चीन आणि दक्षिण आफ्रिका) या देशांच्या परिषदेच्या पाश्र्वभूमीवर पत्रकारांना ही माहिती दिली. चीनचे अध्यक्ष झी जिनपिंग यांनी अध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर प्रथमच मनमोहन सिंग यांच्याशी त्यांची चर्चा होणार आहे. याबद्दल विचारले असता अशा प्रकारच्या बैठकांमधूनच चीन आणि अन्य देशांमधील द्विपक्षीय संबंध तसेच सहकार्य वाढीस लागण्यास मदत होते, असे लेई यांनी सांगितले. ‘ब्रिक्स’ परिषदेच्या व्यासपीठावरून भारत आणि चीनमधील नेत्यांना द्विपक्षीय संबंध सुधारण्यासाठी चर्चा करण्याची वारंवार संधी मिळते. त्यामुळे त्यांच्यामधील वैयक्तिक संबंध, उभयतांचा विश्वास वाढीस लागतो, असे मत लेई यांनी वक्त केले. गेल्या काही वर्षांत चीनचे माजी अध्यक्ष हू जिंताओ आणि मनमोहन सिंघ यांच्यात अनेकदा चर्चा झाल्या आहेत, याकडे लेई यांनी लक्ष वेधले.