उत्तरप्रदेशमधील बरेलीमध्ये १२ वर्षाच्या चिमुकलीने धाडस दाखवत तिच्या आईवर बलात्काराचा प्रयत्न करणा-या चार नराधमांना प्रतिकार केला. नराधमांनी त्या मुलीलाही मारहाण केली मात्र त्यानंतर चिमुकली मागे हटली नाही. मुलगी आणि तिच्या आईच्या आवाजामुळे हा प्रकार ग्रामस्थांना समजला आणि  नराधमांनी घटनास्थळावरुन पळ काढला.

रविवारी रात्री बरेलीमध्ये राहणारी महिला तिच्या १२ वर्षाच्या मुलीसोबत चालत जात होती. या दरम्यान चार नराधमांनी त्या महिलेला गाठले. त्यांनी महिला आणि तिच्या मुलीचे अपहरण केले आणि रस्त्यालगतच्या एका झोपडीत नेले. त्या महिलेला चाकूचा धाक दाखवत तिच्यावर बलात्काराचा प्रयत्न केला. या दरम्यान १२ वर्षाच्या मुलीने धाडस दाखवले आणि नराधमांना प्रतिकार केला. महिला आणि तिच्या मुलीच्या ओरडण्याचा आवाज ऐकून ग्रामस्थही घटनास्थळी आले. पण तोपर्यंत नराधमांनी घटनास्थळावरुन पळ काढला. नराधमांनी पीडित महिलेवर चाकूहल्ला केला असून यात त्या किरकोळ जखमी झाल्या आहेत. सत्यपाल गंगवार, दिजेंद्र गंगवार, सुभाष गंगवार आणि जयंत गिरी अशी या नराधमांची नावे असून सर्व जण गावातील रहिवासी आहेत. सध्या पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.

टाईम्स ऑफ इंडियाने दिलेल्या वृत्तानुसार पोलिसाांनी हा घटनाक्रमच फेटाळून लावला आहे. महिलेवर बलात्काराचा प्रयत्न झालेला नाही. पीडित महिला आणि संबंधीत व्यक्तींचा जागेवरुन वाद असून या वादातून महिलेवर हल्ला झाला असे पोलिसांनी म्हटले आहे. मात्र सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार डिसेंबर २०१५ मध्ये गावातील ग्रामपंचायत निवडणुकीत पीडित महिलेच्या कुटुंबीयांनी आरोपींनी समर्थन दिलेल्या उमेदवाराविरोधात मतदान केले होते. तेव्हापासून हा वाद सुरु असल्याचे वृत्तात म्हटले आहे. पीडित महिलेच्या कुटुंबाला धडा शिकवण्याचा आरोपींचा निर्धार होता असे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. पोलिसांनी जखमी झालेल्या पीडित महिलेला खासगी रुग्णालयात जाण्यास सांगितले होते. मात्र ग्रामस्थांनी आक्षेप घेताच पोलिसांनी महिलेला सरकारी रुग्णालयात दाखल केले.