दिल्लीत सूर्य आग ओकतो आहे आणि उकाडा प्रचंड वाढला आहे. अंगाची लाही लाही होते आहे. अशात दिल्लीत उष्माघाताचा बळी गेला आहे. दिल्लीतल्या राम मनोहर लोहिया रुग्णालयात एका माणसाचा उष्माघाताने बळी गेला आहे. त्याला ताप आला म्हणून रुग्णालयात दाखल कऱण्यात आलं. त्याचा ताप थर्मामीटरवर मोजण्यात आला तेव्हा तो १०७ डिग्री इतका प्रचंड होता असं डॉक्टरांनी सांगितलं.

नेमकी काय घडली घटना?

दिल्लीतल्या राम मनोहर रुग्णालयात मूळचा बिहारचा असलेल्या ४० वर्षीय माणसाचा मृत्यू झाला आहे. त्याला उन्हाचा तडाखा बसल्याने या रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. उष्मा सहन न झाल्याने या माणसाला सोमवारी रात्री उशिरा रुग्णालयात दाखल करण्यात आलं. या माणसाबाबत डॉक्टरांनी माहिती दिली की सदर रुग्ण हा अशा खोलीत राहात होता जिथे कूलर आणि पंखा काहीही नव्हतं. त्याला सणकून ताप आला. आम्ही जेव्हा त्याचा ताप मोजला तेव्हा पारा १०७ डिग्रींवर गेला. त्या माणसाची प्राणज्योत मालवली आहे. दिल्लीत उष्माघाताचा हा पहिला बळी आहे असं डॉक्टरांनी सांगितलं. एनडीटीव्हीने हे वृत्त दिलं आहे.

दिल्लीत उन्हाचा पारा प्रचंड वाढला आहे

दिल्लीत उन्हाचा पारा प्रचंड वाढला आहे. बुधवारी सकाळी ४६ ते ४७ डिग्री तापमानाची नोंद झाली. तर बुधवारी दुपारी पारा ५० डिग्रींच्या पुढे गेला होता. बुधवारचा दिवस म्हणजेच २९ मे चा दिवस हा दिल्लीतला मागील १०० वर्षांतला सर्वात उष्ण दिवस म्हणून नोंदला गेला. मुंगेशपूर हवामान विभागाने ही माहिती दिली.

हे पण वाचा- Sensor Error : दिल्लीत ५२ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद, पण IMD म्हणतं, “स्थानिक घटकातील त्रुटीमुळे…”

दिल्लीत रेड अलर्ट

दिल्लीत मे महिन्याच्या शेवटच्या दिवसात तापमानात मोठी वाढ झाली आहे. कडक उन्हामुळे शहरात पुढील दोन दिवस ‘रेड अलर्ट’ जारी करण्यात आला आहे. IMD ने बुधवारच्या आपल्या अंदाजात म्हटले आहे की बुधवारी दिल्लीच्या अनेक भागांमध्ये तीव्र उष्णता जाणवू शकते आणि जोरदार वारेही वाहतील. मात्र, आकाश प्रामुख्याने निरभ्र राहील असंही सांगण्यात आलं होतं मात्र दिल्लीत काही भागांमध्ये हलका पाऊस झाला.

दिल्लीत भीषण पाणी टंचाई

एकीकडे तापमानाचा पारा वाढत असताना दिल्लीत जलसंकटही निर्माण झाले आहे. दिल्लीतील अनेक भागात भीषण पाणी टंचाई निर्माण झाली आहे. १ मे पासून हरियाणाने दिल्लीच्या वाट्याचे पाणी सोडले नसल्याचा आरोपही मंत्र्यांनी केला आणि हा प्रश्न लवकर सोडवला नाही तर दिल्ली सर्वोच्च न्यायालयात जाईल. पाण्याची वाढती मागणी पूर्ण करण्यासाठी शेजारी हरियाणा आणि उत्तर प्रदेशवर मोठ्या प्रमाणावर अवलंबून असलेल्या दिल्लीतील गंभीर जलसंकट उभं राहिलं असल्याने पाणी जपून वापरण्याचे आवाहन करण्यात आलं आहे.