नवी दिल्ली : काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी रविववारी आरोप केला की, भाजपच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकार रेल्वेला ‘अक्षम’ सिद्ध करू इच्छित आहे. सर्वसामान्यांसाठी महत्त्वाची असलेली रेल्वे आपल्या ‘मित्रांना’ विकण्याचे प्रयत्न सुरू असून रेल्वे वाचविण्यासाठी मोदी सरकार दूर करणे गरजेचे आहे, असे त्यांनी सांगितले.

राहुल गांधी यांनी ‘एक्स’वर एक चित्रफीत प्रसारित केली, ज्यामध्ये लोक शौचालय व ट्रेनमधील बर्थवर बसून सरकारवर टीका करत आहेत. ‘‘नरेंद्र मोदींच्या राजवटीत रेल्वे प्रवास शिक्षा बनला आहे. सर्वसामान्यांच्या गाडयांमधून जनरल डबे कमी करून ‘एलिट ट्रेन्स’चा प्रचार करणाऱ्या मोदी सरकारकडून प्रत्येक क्षेणीतील प्रवाशांना त्रास दिला जात आहे. कन्फर्म तिकीट असूनही प्रवाशांना आरामशीर प्रवास करता येत नाही,’’ असे राहुल गांधी यांनी सांगितले.

हेही वाचा >>> इंडिया सत्तेत आल्यास ‘सीएए’ रद्द करणार! माकपच्या टीकेवर चिदम्बरम यांचा खुलासा

मोदी सरकारला आपल्या धोरणांनी रेल्वे दुर्बळ करून ती अकार्यक्षम असल्याचे सिद्ध करायचे आहे, जेणेकरून त्यांना ती त्यांच्या मित्रांना विकण्यासाठी बहाणा मिळेल असा आरोप राहुल यांनी केला आहे.

घटलेल्या मजुरीवरून मोदींवर टीका

दरम्यान, काँग्रेसने रविवारी मजुरांच्या घटलेल्या वेतनाचा मुद्दा उपस्थित करत त्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी जबाबदार असल्याची टीका केली. भाववाढीशी तुलना करता मजुरांच्या वेतनामध्ये अभूतपूर्व घट झाली आहे. ‘इंडिया’ आघाडी सत्तेवर आल्यावर देशाच्या विकासाचा दर पुन्हा वाढेल असे पक्षाचे सरचिटणीस जयराम रमेश यांनी सांगितले. रमेश यांनी केंद्र सरकाराच्या अधिकृत आकडेवारीसह अनेक डेटा स्रोतांचा संदर्भ देऊन टीका केली की, मजूर १० वर्षांपूर्वी जितक्या वस्तू खरेदी करू शकत होते त्यापेक्षा आज कमी करू शकतात.