१ जून रोजी मान्सून केरळमध्ये दाखल होणार होता. मात्र, आता मान्सूनच आगमन काही दिवस लांबणार आहे. बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या अम्फान महाचक्रीवादळाचा परिणाम मान्सूनच्या आगमनावर झाला असल्याचं भारतीय हवामान विभागानं म्हटलं आहे. त्यामुळे भारतात मान्सून दाखल होण्यास विलंब होणार आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

भारतीय हवामान विभागाचे प्रमुख मृत्यूंजय मोहापात्रा यांनी मान्सूनच्या आगमनाविषयीची माहिती दिली. “मान्सून केरळच्या किनारपट्टीवर १ जून रोजी दाखल होणार होता. मात्र, अम्फान चक्रीवादळामुळे मान्सूनच्या गतीवर परिणाम झाला आहे. त्यामुळे १ जूनऐवजी ५ जून रोजी मान्सून केरळच्या किनारपट्टीवर दाखल होईल,” असं मोहापात्रा म्हणाले.

“बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या महाचक्रीवादळामुळे मान्सूनसाठी लागणाऱ्या अनुकूल परिस्थितीवर परिणाम झाला आहे. त्यामुळे मान्सूनवर याचा परिणाम झाला आहे. ५ जूनपर्यंत मान्सून केरळच्या किनारपट्टीवर दाखल होईल, असा अंदाज हवामान विभागाचा आहे. त्याचबरोबर अम्फानमुळे देशातील वातावरणावर चांगले आणि वाईट असे दोन्ही परिणाम झाले आहेत, असं त्यांनी सांगितलं.

अम्फानने घेतले ७२ बळी

बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या अम्फान महाचक्रीवादळानं बुधवारी पश्चिम बंगालमध्ये तांडव घातले. या महाचक्रीवादळाने रौद्र रूप धारण करत ७२ जणांचा बळी घेतला आहे. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी या चक्रीवादळाचं वर्णन करोना विषाणूपेक्षाही भयानक असं केलं आहे. गुरूवारी पत्रकारांशी बोलताना मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी अम्फन चक्रीवादळामुळे पश्चिम बंगालमध्ये आतापर्यंत ७२ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती दिली. तसेच मृत्यू झालेल्या कुटुंबीयांना दोन लाख ५० हजार रूपयांच्या मदतीची घोषणाही यावेळी त्यांनी केली.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Monsoon may be delayed expected to hit kerala on june 5 bmh
Show comments