पाकिस्तानमधील सध्याच्या राजकीय परिस्थितीस लष्कर प्रमुख जनरल कमर जावेद बाजवा व आयएसआय प्रमुख लेफ्टनंट जनरल फैज हमीद जबाबदार आहेत, असा आरोप पदच्युत पंतप्रधान नवाझ शरीफ यांनी केला आहे. विरोधी पक्षांची तिसरी संयुक्त सभा नुकतीच झाली, त्यात, पंतप्रधान इम्रान खान प्रणीत सरकारचे दिवस भरत आल्याची टीका पक्षाच्या उपाध्यक्ष मरयम नवाझ यांनी केली.

पाकिस्तान डेमोक्रॅटिक मूव्हमेंट (पीडीएम) या ११ विरोधी पक्षांच्या आघाडीची स्थापना इम्रान खान सरकारला हटवण्यासाठी २० सप्टेंबरला झाली होती. त्यांनी आतापर्यंत दोन मोठय़ा सभा गुजरावाला व कराची येथे घेतल्या होत्या. तिसरी सभा क्वेट्टा या बलुचिस्तानच्या राजधानीत रविवारी झाली. लंडन येथून दूरसंवादाच्या माध्यमातून बोलताना पाकिस्तान मुस्लीम लीगचे नवाझ गटाचे प्रमुख नवाझ शरीफ यांनी सांगितले की, पाकिस्तानातील सध्याच्या दयनीय परिस्थितीस लष्कर प्रमुख बाजवा, आयएसआय महासंचालक हमीद हे जबाबदार आहेत.

जनरल बाजवा तुम्ही २०१८ मधील निवडणुकीत केलेल्या गैरप्रकारांचे उत्तर द्या, संसदेत त्या वेळी सौदेबाजी झाली होती. इम्रान खान यांना लोकांच्या इच्छेविरुद्ध पंतप्रधान करण्यासाठी लष्कराने मध्यस्थी केली. त्यात राज्यघटना गुंडाळून ठेवण्यात आली. कायदे बाजूला ठेवण्यात आले. त्यातून लोक दारिद्रय़ात ढकलले गेले असे शरीफ यांनी सांगितले.

त्यांनी आयएसआय प्रमुखावर देशाच्या राजकारणात हस्तक्षेपाचा आरोप केला. सगळ्या लष्कराला बदनाम करण्याचा आपला हेतू नाही, त्यामुळे मुद्दाम नावे घेऊन बोलत असल्याचे शरीफ यांनी सांगितले.