काँग्रेसने अव्हेरलेले माजी पंतप्रधान पी.व्ही.नरसिंह राव यांचे स्मारक दिल्लीत उभारण्यात येणार आहे. काँग्रेसने त्यांच्या निधनानंतर अंत्यविधीही दिल्लीत करू दिला नव्हता, पण आता १० वर्षांनी नरसिंह राव यांना न्याय मिळाला असून त्यांचे स्मारक येथे बांधण्यात येणार आहे.
   दरम्यान, उत्तर प्रदेशात समाजवादी पक्षाचे नेते आझम खान यांनी असा आरोप केला की, बाबरी मशीद पाडण्यासाठी नरसिंह राव सरकारने रा.स्व.संघाशी साटेलोटे केले म्हणून आता केंद्र सरकार त्यांचे स्मारक उभारत आहे. एनडीए सरकार यमुना नदीच्या किनाऱ्यावर ‘एकता स्थळ’ म्हणून नरसिंह राव यांचे स्मारक उभारणार आहे.
शहर विकास मंत्रालयाने याबाबत मंत्रिमंडळ टिप्पणी तयार केली आहे. आंध्र प्रदेश सरकारकडून प्रस्ताव आल्यानंतर नरसिंहराव यांचे स्मारक करण्याचे ठरवण्यात आले.
राव यांनी १९९१ ते १९९६ या काळात पंतप्रधानपद भूषवले. त्या वेळी त्यांनी आर्थिक सुधारणा अर्थमंत्री मनमोहन सिंग यांना राबवायला सांगितले होते. २००४ मध्ये त्यांचा मृत्यू झाला तेव्हा काँग्रेस प्रणीत युपीए सरकारने त्यांचे स्मारक करण्यास नकार दिला.
२०१३ मध्ये तर युपीए सरकारने यापुढे कुठल्याही नेत्याची स्मारके जागा नसल्याने उभारण्यात येऊ नयेत असा आदेश काढला. विजय घाट व शांतीवनाच्या मध्ये २२.५६ एकर जागा एकता स्थळासाठी दिली आहे. सध्या या भागात माजी पंतप्रधान इंद्रकुमार गुजराल, चंद्रशेखर, माजी राष्ट्रपती ग्यानी झैलसिंग, शंकरदयाळ शर्मा, के.आर.नारायणन, आर. व्यंकटरमण यांच्या समाधीस्थळांचा समावेश आहे. समाधीस्थळ संकुलात सहा जागा संपल्या असून तीन रिकाम्या आहेत. राव यांचे स्मारक मार्बलमध्ये केले जाणार आहे. तेलुगु देसम पक्षाने ऑक्टोबरमध्ये केंद्राकडे मागणी केली होती. नरसिंहराव हे तेलंगणातील होते.