२६ ऑक्टोबर २०२० रोजी निकिता तोमर या २१ वर्षीय महाविद्यालयीन तरुणीची हरियाणाच्या फरीदाबादमध्ये दिवसाढवळ्या गोळ्या घालून हत्या करण्यात आली होती. या प्रकरणात आज फरीदाबाद न्यायालयाने निकाल दिला असून या प्रकरणातील दोन आरोपी तौसिफ आणि रेहान यांना जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे. २४ मार्च रोजी या दोघांना निकिता तोमरच्या हत्या प्रकरणात न्यायालयाने दोषी मानले होते. तसेच, निकाल २६ मार्चपर्यंत म्हणजेच आजपर्यंत राखून ठेवला होता. निकिताच्या पालकांनी हल्लेखोरांना फाशीची शिक्षा दिली जावी, अशी मागणी केली होती. मात्र, त्यांना जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे. घटनेच्या बरोबर ५ महिन्यांनंतर निकिताला न्याय मिळाल्याची भावना व्यक्त होऊ लागली आहे.

तिसऱ्या आरोपीची निर्दोष मुक्तता!

२४ मार्च रोजी या प्रकरणाच्या झालेल्या सुनावणीमध्ये तौसिफ आणि रेहान या दोघांना हत्या, हत्येच्या हेतूने अपहरण आणि गुन्हेगारी कट रचण्याच्या गुन्ह्यांसाठी दोषी सिद्ध करण्यात आले होते. या प्रकरणातील तिसरा आरोपी अर्जुदीन याच्यावर गुन्ह्यासाठीचे हत्यार पुरवण्याचा आरोप ठेवण्यात आला होता. मात्र, त्याची न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली आहे.

नेमकं काय घडलं?

तौसिफनं निकिताला लग्नासाठी मागणी घातली होती. मात्र, निकिताने त्याला नकार दिला होता. आपण दुसऱ्याशी लग्न करणार असल्याचं निकिता त्याला म्हणाली होती. त्यामुळे तौसिफ संतप्त झाला होता. दोन वर्षांपूर्वी देखील निकिताच्या कुटुंबाने तौसिफविरोधात तक्रार दाखल केली होती. त्यासाठी त्याला अटक देखील झाली होती. याच रागातून तौसिफने रेहानच्या साथीने निकिताचं अपहरण करण्याचा कट रचला. मात्र, दिवसाढवळ्या तिचं अपहरण करण्याचा कट फसला. त्यामुळे तौसिफनं रागाच्या भरात पिस्तुल काढून तिला गोळी घातली. यामध्ये निकिताचा जागेवरच मृत्यू झाला.