माथेफिरू हुकूमशहा म्हणून उत्तर कोरियाच्या किम जोंग उनचा उल्लेख केला जातो. उत्तर कोरियाने हेरगिरी करण्यासाठी नुकतेच एक उपग्रह अवकाशात पाठविण्याचा प्रयत्न केला. पण उपग्रहाचे प्रक्षेपण होताच आकाशात रॉकेटचा मोठा स्फोट झाला आणि उत्तर कोरियाच्या हेरगिरीच्या मनसुब्यावर पाणी शिंपडले गेले. त्यानंतर आता उत्तर कोरियाचा आणखी एक प्रताप समोर आला आहे. शेजारच्या दक्षिण कोरियाशी उत्तर कोरियाचे हाडवैर आहे. त्यांना नेहमीच अण्वस्त्राची धमकी उत्तर कोरियाकडून दिली जाते. मात्र आता अण्वस्त्र न डागता उत्तर कोरिया मोठ्या फुग्यातून कचऱ्याचे ढिगारे दक्षिण कोरियात टाकत आहे. याचे फोटो व्हायरल झाले असून दक्षिण कोरियाने तिथल्या जनतेला सावधानतेचा इशारा दिला आहे.

दक्षिण कोरियाच्या लष्करप्रमुखांनी (Joint Chiefs of Staff – JCS) सांगितले की, बुधवारी सकाळी उत्तर कोरियाकडून आमच्या हद्दीत २६० फुगे येत असल्याचे दिसले. मंगळवारच्या रात्रीपासून हे फुगे उडून येत होते. देशातील विविध भागात हे फुगे आता खाली पडत आहेत. सेऊल आणि सीमाभागातील इतर शहरांत हे फुगे पडले आहेत. दक्षिण कोरियाच्या लष्कराकडून या फुग्यांचे फोटोही जाहीर करण्यात आले आहेत. या फुग्याच्या खाली मोठ्या प्लास्टिकच्या पिशव्या बांधलेल्या आहेत. ज्यामध्ये कचरा भरलेला असल्याचे निदर्शनास आले.

किम जोंग-उनच्या मनोरंजनासाठी दरवर्षी २५ सुंदर मुलींची भरती; उत्तर कोरियातून पळालेल्या लेखिकेचा दावा

लष्करप्रमुखांनी सांगितले की, फुग्याबरोबर आलेल्या कचऱ्याची पाहणी केली असता त्यात जोखीम असणाऱ्या वस्तू आढळून आलेल्या नाहीत. यामध्ये प्लास्टिकच्या पटाल्या, बॅटरी, चपला असा विविध प्रकारचा कचरा आढळून आला आहे.

जेसीएसने पुढे म्हटले की, उत्तर कोरियाच्या या कृत्यामुळे आंतरराष्ट्रीय नियमांचे उल्लंघन तर झाले आहेच. तसेच आमच्या नागरिकांच्या सुरक्षिततेलाही धोका निर्माण झाला आहे. उत्तर कोरियाने हे अमानवी आणि अतिशय खालच्या दर्जाचे कृत्य तात्काळ थांबावावे, अन्यथा पुढील परिणामांना ते स्वतः जबाबदार असतील, असा इशाराही देण्यात आल्याचे सीएनएनने आपल्या वृत्तात म्हटले आहे.

बीबीसीने दिलेल्या वृत्तानुसार जेसीएसने नागरिकांना सावधानतेचा इशारा दिला आहे. “तुमच्या परिसरात जर अशाप्रकारचे फुगे पडले तर त्यातील सामानाला हात लावू नका. त्यापासून दूर रहा. यामध्ये कचरा किंवा इतर काहीही असू शकते. फुगे पडल्यास त्याची माहिती जवळच्या पोलीस ठाण्याला देण्यात यावी”, असे निवेदन करण्यात आले आहे.

फुग्याचा जुना इतिहास

१९५० च्या दशकात कोरियाचे विभाजन होऊन उत्तर आणि दक्षिण कोरिया असे दोन तुकडे पडले. तेव्हाही दोन्ही देशांमध्ये फुगे पाठविण्याचा प्रकार घडला होता. तेव्हा एकमेकांच्या देशात फुग्याद्वारे प्रचार साहित्य पाठविले जात होते. मात्र यावेळी उत्तर कोरियाकडून कचऱ्याचे ढिग पाडले जात आहेत. उत्तर कोरियाचे उप संरक्षण मंत्री किम कांग इल यांनी याबाबत प्रतिक्रिया देताना सांगितले की, आम्ही दक्षिण कोरियाच्या सीमेत इतका कचरा टाकू की, तो स्वच्छ करताना त्यांची पुरेवाट झाली पाहीजे. मगच त्यांना चांगली अद्दल घडेल.