हुकूमशाह किम जोंग उन बारीक झाल्याने उत्तर कोरियात चिंतेचं वातावरण पसरलं आहे. त्याच्या तब्येतीमुळे उत्तर कोरियातील नागरिक चिंतातूर झाले आहेत. त्याचा नवा व्हिडिओ पाहिल्यानंतर नागरिकांना अश्रू अनावर झाले आहेत. त्याचं वजन २० किलोने कमी झाल्याचं सांगण्यात येत आहे. ३७ वर्षीय किमचं वजन खुपच वेगाने घटल्याने त्याच्या तब्येतीबाबत वावड्या उठू लागल्या आहेत. या व्हिडिओत प्योंगयांगमधील नागरिक एक कार्यक्रम मोठ्या स्क्रिनवर बघताना दिसत आहे. या कार्यक्रमात किम जोंग उन आला होता. तेव्हा त्याची स्थिती बघून उपस्थितांच्या डोळ्यात अश्रू तरळले.

काही दिवसांपूर्वी किम जोंग उन याचा नोव्हेंबर-डिसेंबर २०२० मधला फोटो समोर आला होता. यात फोटोत त्याने वजन कमी केलं की आजारामुळे बारीक झाला आहे, याबाबत शंका उपस्थित करण्यात आली होती. मात्र या व्हिडिओनंतर तो डायटवर असल्याचा निरीक्षण नोंदवण्यात आलं आहे. असं असलं तरी अद्यापही हे वजन कसं कमी झालं याबाबत अधिकृत माहिती नाही. रॉयटरने ही व्हिडिओ क्लिप शेअर केली आहे. तसेच ही क्लिप अधिकृत आहे की, नाही याबाबत शंका उपस्थित केली आहे.

“देशात प्रत्येक जण आपल्या नेत्याचं वजन कमी झाल्याने चिंतेत आहेत. आम्हाला त्यांचं असं स्वरुप पाहून दु:ख झालं आहे. त्यामुळे आम्हाला अश्रू रोखणं कठीण झालं आहे”, असं उत्तर कोरियातील एका व्यक्तीने व्हिडिओत सांगितलं. हा व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे. नेटकरीही आपल्या शैलीत व्हिडिओवर कमेंट्स देत आहेत. आतापर्यंत १ लाखांहून अधिक लोकांनी हा व्हिडिओ पाहिला आहे. मात्र अद्यापही सरकारी मीडियाने याबाबत अधिकृत माहिती दिलेली नाही. त्याचं वजन कमी होण्याचं नेमकं कारण अद्यापही अस्पष्ट आहे.